खूनसत्र ! एकाच जमिनीच्या वादापायी मुलापाठोपाठ दहा वर्षांनंतर पित्याचीही हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 07:05 PM2021-12-11T19:05:57+5:302021-12-11T19:06:47+5:30

मुलाच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या नात्यातील व्यक्तीनेच केला वडिलांचा खून

Recurrence of murder ten years later; Father killed in land dispute after son | खूनसत्र ! एकाच जमिनीच्या वादापायी मुलापाठोपाठ दहा वर्षांनंतर पित्याचीही हत्या

खूनसत्र ! एकाच जमिनीच्या वादापायी मुलापाठोपाठ दहा वर्षांनंतर पित्याचीही हत्या

Next

सिरसाळा/बीड : जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून दहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला होता. पाठोपाठ पित्यालाही डोक्यात धारदार शस्त्राचा वार करून निर्घृणरीत्या संपविण्यात आले. सिरसाळा (ता. परळी) येथे ८ डिसेंबर रोजी रात्री ही थरारक घटना उघडकीस आली. मारेकरी फरार आहे. हरिभाऊ नामदेव ढेंबरे (वय ७५, रा. सिरसाळा) असे मयताचे नाव आहे.

दहा वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा विलास याची हत्या झाली होती. या आरोपावरून महादेव पोटे (रा. सिमरी पारगाव ता. माजलगाव) या नात्यातील व्यक्तीवर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात २०१६ मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. तेव्हापासून तो कारागृहाबाहेर आहे. दरम्यान, ८ डिसेंबर सायंकाळी रोजी विलासचे वडील हरिभाऊ ढेंबरे हे शेतातून शेळ्या घेऊन घराकडे परतत होते. यावेळी पोहनेर रोडवर शेतीच्या जुन्या वादातून महादेव पोटे याने त्यांच्याशी वाद घातला.

जमीन माझ्या नावे करा, असे म्हणत त्याने शस्त्राने त्यांच्या डोक्यात वार केला. घाव वर्मी बसल्याने रक्तस्राव होऊन हरिभाऊ ढेंबरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पोबारा केला. सिरसाळा ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, मारेकऱ्यास तातडीने जेरबंद करा, त्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा ९ रोजी नातेवाइकांनी घेतला. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी आरोपीच्या अटकेचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी घटनास्थळी भेट दिली. मयत हरिभाऊ यांचा मुलगा कैलास ढेंबरे यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा ठाण्यात महादेव पोटेवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास उपनिरीक्षक प्रकाश शेळके करत आहेत.

जमिनीच्या वादात गेले दोन जीव
दहा वर्षांपूर्वी ९ एकर जमिनीचा हरिभाऊ ढेंबरे व महादेव पोेटे यांच्यात व्यवहार झाला होता. ढेंबरे यांची जमीन पोटे याने खरेदी करण्यासाठी इसार पावती केली होती. मात्र, नंतर ढेंबरे यांनी ती दुसऱ्याच व्यक्तीला विक्री केली. यातून त्यांच्यात वाद पेटला. मुलगा विलासनंतर पिता हरिभाऊ यांना यामुळे जिवानिशी जावे लागले. मयत हरिभाऊ यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, दहा वर्षांनंतर खुनाची पुनरावृत्ती झाल्याने ढेंबरे कुटुंबीयांवर दुहेरी आघात झाला.

Web Title: Recurrence of murder ten years later; Father killed in land dispute after son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.