लालपरी थांबलेलीच; दररोज ४० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:52+5:302021-06-05T04:24:52+5:30
चालक, वाहकही घरातच : बीड जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने बससेवा बंद बीड : जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लालपरी जागेवरच उभी ...
चालक, वाहकही घरातच : बीड जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने बससेवा बंद
बीड : जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लालपरी जागेवरच उभी असल्याने राज्य परिवहन महामंडळ तोट्यात आहे. रोज ४० लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील काही जिल्ह्यात बससेवा सुरू झाली असली तरी बीड जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने सेवा बंद आहे. बससेवा बंद असल्याने चालक, वाहकही दोन महिन्यांपासून घरातच आहेत. ज्या दिवशी पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के पेक्षा कमी येईल, त्या दिवशी जिल्ह्यातील बससेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील बससेवाही बंद केली होती. अगोदरही गतवर्षी लॉकडाऊनमुळे अनेक महिने लालपरी जागेवरच होती, तसेच चालक, वाहकांसह इतर कर्मचारीही घरातच होते. त्यांच्या वेतनाचाही प्रश्न ऐरणीवर आला होता; परंतु सद्यस्थितीत वेतन वेळेवर होत असल्याने समाधान आहे. असे असले तरी लालपरी मात्र आर्थिक संकटात आहे. रोज सरासरी ४० लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मार्च महिन्यापासून आतापर्यंत करोडो रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे. १ जूनपासून काही जिल्ह्यातील बससेवा सुरू करण्यात आली आहे; परंतु बीडमधील कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट हा १० पेक्षा जास्त असल्याने निर्बंध ठेवून शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे बसेस बंदच राहणार असल्याचे सध्या तरी जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
--
बस सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे; परंतु इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमधील रुग्णांची संख्या अधिक असल्याने बससेवा सध्या तरी बंदच राहु द्या, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. सर्व चालक, वाहक घरीच असून, वेतन दिले जात आहे.
कैलास लांडगे, विभागीय नियंत्रक, बीड.
---
अशी आहे आकडेवारी
एकूण बसेस ५४०
एकूण आगार ८
एकूण बसस्थानक ८
एकूण नियंत्रण कक्ष ३