लालपरी असुरक्षित; अग्नीशमन यंत्र गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:36 AM2021-02-20T05:36:50+5:302021-02-20T05:36:50+5:30
बीड : राज्यात रापमच्या बसेसला आग लागल्याच्या आणि लावल्या जात असल्याच्या घटना उघड होत आहेत. हाच धागा पकडून बीड ...
बीड : राज्यात रापमच्या बसेसला आग लागल्याच्या आणि लावल्या जात असल्याच्या घटना उघड होत आहेत. हाच धागा पकडून बीड बसस्थानकातील पाच बसेसची तपासणी केली असता आगीच्या दृष्टीने काहीच उपाययोजना बसमध्ये नसल्याचे दिसले. जवळपास बसेसमध्ये अग्निरोधक यंत्र नाहीत. तर ज्यामध्ये आहेत, ते धुळखात पडून असल्याचे दिसून आले. यामुळे प्रवाशांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित समजला जातो. ग्रामीण भागातील सामान्य प्रवाशांपासून ते नोकरदारांपर्यंत सर्वच लोक बसने प्रवास करतात. परंतु मागील काही दिवसांपासून बसेसचे अपघात, घटना आदींमुळे बसची सुरक्षितताच धोक्यात असल्याचे दिसते. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रथमोपचार पेट्याही गायब
पाहणी केलेल्या बसेसमधील प्रथमोपचार पेट्याही गायब होत्या. एक दोन बसमध्ये या पेट्या दिसल्या. परंतु त्या काहीच साहित्य नव्हते. या पेट्यांची दुरवस्था झाल्याचे बीड-पुणे या गाडीत दिसले. मागील अनेक महिन्यांपासून याची दुरूस्तीच झाली नसल्याचे पाहिलेल्या परिस्थितीवरून दिसते.
खिडक्याही तुटलेल्या
ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसले. अनेक बसेसच्या खिडक्या तुटलेल्या होत्या. गजही बाहेर निघाले होते. काही बसेसचे इंडिकेटर्स तुटलेले आढळून आले. चालकाच्या बाजुचा आरशाला दोरीने बांधल्याचे दिसले. मालवाहतूक करणाऱ्या गाडीला इंडिकेटर्स नव्हते.
आगारात आओ जावो घर तुम्हारा
आगारात सामान्य व्यक्तिला जाण्यास बंदी असते. मुख्य प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षकांची नियूक्ती केलेली असते. परंतू आगारात कोणीही जावे आणि निघून यावे, अशी परिस्थिती बीडमध्ये आहे. त्यामुळे आगारातील साहित्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
भिंती रंगल्या, धुम्रपानही सर्रास
बसस्थानकात येणारे प्रवासी सर्रासपणे गुटखा, मावा खावून भिंतीवर, कोपऱ्यांमध्ये थुंकतात. तसेच सर्रासपणे धुम्रपानही करीत असल्याचे दिसते. याचा त्रास इतर सामान्य प्रवाशांना होतो. परंतू त्यांच्यावर कोणीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे बसस्थानकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
चालकांनाही नाही गांभीर्य
बसेस नादुरूस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असुरक्षित असतानाही चालकांकडून आगार प्रमुखांकडे तक्रार केली जात नाही. चालक कारवाईच्या भितीपोटी ठोस भूमिका घेत नसल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
सुविधा द्या, प्रतिमा मलीन होत आहे...
बसचा प्रवास हा सुरक्षित समजला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून अपघात वाढले. सुविधाही नावालाच आहेत. त्यामुळे बसची प्रतिमा मलीन होत चालली आहे. यावर उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे.
- किरन नन्नावरे, प्रवासी, पाडळसिंगी ता.गेवराई
या बसेसमध्ये
अग्नीशमन यंत्रच नाही !
१ - बीड-पुणे (एमएच१४/बीटी ३३९९)
२ - लातूर-बीड (एमएच२०/बीएल१८६५)
३ -साेलापूर-औरंगाबाद (एमएच११/बीएल९४४३)
४ - बारामती-बीड (एमएच४०/एन९३५९)
५ - बीड-लातूर (एमएच२०/बीएल१९७५)