रिफाइंड तेलाने वाढते चरबी; घाण्याच्या तेलाला मागणी वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:36 AM2021-08-19T04:36:34+5:302021-08-19T04:36:34+5:30
पुरुषोत्तम करवा / लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : सध्या खाण्याच्या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी होताना दिसत आहेत. यातच ...
पुरुषोत्तम करवा /
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : सध्या खाण्याच्या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी होताना दिसत आहेत. यातच नागरिक कमी भावामुळे रिफाइंडसारख्या तेलाचा वापर करीत असल्याने नागरिकांमध्ये चरबी वाढण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे नागरिकांचा पुन्हा लाकडी घाण्याचे तेल घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे.
दोन दशकांपूर्वी नागरिकांना केवळ घाण्यातून तयार झालेले करडईचेच तेल मिळत असे. हे तेल घाण्याच्या माध्यमातून तयार करण्याचे काम तेली समाजाकडून केले जात होते. त्याकाळी करडईचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या काळात तेल काढणारे घाणे मोठ्या प्रमाणावर दिसत असत. या घाण्याला एक बैल जुंपून तो दिवसभर घाण्याला फिरत असे. त्यात करडई बारीक होऊन तेल निघत असे. त्या तेलाला गरम करून खाली साचलेला गाळ काढून ते विक्री केले जात असे. त्यावेळी नागरिकांना फिल्टर नसतानाही दर्जेदार तेल मिळत असे. कालांतराने फिल्टरयुक्त तेल येऊ लागले. मशिनरीद्वारे हे तेल काढण्यात येत असल्याने व आकर्षक पॅकिंग येत असल्याने नागरिक याकडे आकर्षित होऊ लागले. त्यानंतर रिफाइंड तेल बाजारात उपलब्ध झाले. त्याचा भावही कमी असल्याने नागरिक याकडे आकर्षित होऊ लागले. करडई तेल महाग असल्याने घाण्याचे तेल घेणाऱ्यांची संख्या रोडावली होती.
...
रिफाइंड तेल घातक का?
सध्या बाजारात अनेक प्रकारचे तेल आल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होऊ लागल्याने विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने डाॅक्टरांकडून चांगले तेल खाण्याचा सल्ला दिला जात आहे.
रिफाइंडसारख्या तेलाचा वापर करीत असल्याने नागरिकांमध्ये चरबी वाढण्याचे प्रकार वाढत आहेत.
....
लाकडी घाण्याच्या तेलाला पर्याय
भेसळीच्या तेलामुळे नागरिक सेंद्रिय पद्धतीने बनविले जात असलेल्या घाण्याच्या तेलाकडे वळले आहेत. हे तेल तयार करण्यासाठी आता अनेक युवक या व्यवसायाकडे वळलेले दिसत आहेत.
सध्या माजलगाव शहरात केवळ एकच घाणा सुरू असल्याने या ठिकाणी तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या अनेक ठिकाणी युवक घाण्याचे तेल तयार करून घरोघरी विक्री करताना दिसत आहेत. यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळू लागला आहे.
.....
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
नागरिकांमध्ये सद्य:परिस्थितीत मोठ्या प्रमाणात तळीव पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात रिफाइंड तेलाचा वापर होत आहे. या तेलामुळे चरबी वाढण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहेत. यामुळे हृदयरोगासारखे आजार उद्भवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्जेदार तेलाचा वापर करावा, ज्यामुळे अनेक आजारांपासून नागरिक दूर राहू शकतील.
-डॉ. श्रेयश देशपांडे, हृदयरोग तज्ज्ञ, माजलगाव
....