प्रादेशिक परिवहन विभागाची ८० वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:05 AM2019-12-07T00:05:29+5:302019-12-07T00:06:22+5:30
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवार व गुरुवार रोजी शहरात वाहन तपासणी मोहीम झाली. या मोहिमेत ८० वाहने विविध कारणांअभावी कारवाईसाठी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात लावण्यात आली.
अंबाजोगाई : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवार व गुरुवार रोजी शहरात वाहन तपासणी मोहीम झाली. या मोहिमेत ८० वाहने विविध कारणांअभावी कारवाईसाठी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात लावण्यात आली. यात स्कूल बस, जेसीबी, टिप्पर व अवैध वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात स्कूल बस पोलीस ठाण्यात अडकल्याने गुरुवारी अनेक शाळांना स्कूलबस अभावी अघोषित सुटी जाहीर करावी लागली.
शहरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने टॅक्स न भरणे, वाहनांचा विमा, फिटनेस प्रमाणपत्र, अवैध वाहतूक करणारी वाहने, अशा विविध नियमांचे उल्लंघन करणा-या ८० वाहनांवर कारवाई करण्यात आली. विभागीय भरारी पथकाने बुधवारी व गुरुवारी ही कारवाई केली. या कारवाईत प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राजू नांगरे, सचिन बंग, उपसहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नितेश उमाळे, प्रविण गाढवे, कोमल मोरे, शुभम अकुलवार, अमोल रंगवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ८० वाहने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात लावून या वाहनांना विविध कारणांवरून दंड देण्यात आला. मात्र, हा दंड भरण्याची सुविधा अंबाजोगाईत नसल्याने तो दंड लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.