तूर विक्रीसाठी २६८६ शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:46 AM2021-01-08T05:46:43+5:302021-01-08T05:46:43+5:30
बीड : जिल्ह्यात शासकीय हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असून आठ दिवसात २,६८६ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली ...
बीड : जिल्ह्यात शासकीय हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असून आठ दिवसात २,६८६ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हंगाम २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने जिल्हयात मार्केटिंग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यात १८ खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी ही नोंदणी सुरू आहे. २८ डिसेंबरपासून नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर दोन-चार दिवस नोंदणी करणाऱ्यांमध्ये उदासीनता दिसून आली. मात्र त्यानंतर दररोज ९०० ते १ हजार शेतकरी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करत आहेत.
ऑनलाइन नोंदणी करिता जिल्हयामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, घाटनांदूर, बर्दापूर, धारुर, शिरुरघाट, कडा, कासारी, शिराळ, मंगरुळ, शिरुर, फुलसांगवी, उमापूर, पारनेर व पाटोदा खरेदी केंद्रावर तूर या पिकाची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
तूर पिकासाठी आधारभूत किंमत ६ हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. शेतकऱ्यांनी तालुक्यातील नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणीसाठी आपले आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे छापील पासबुक (अकाऊंट नंबर व आयएफसी कोड स्पष्ट दिसावा) ऑनलाइन सातबारा उतारा व तलाठ्याच्या सही शिक्यासह पीक पेरा घेऊन आपल्या तूर या पिकाची नोंदणी करावी.
मिलिंद कापुरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बीड.
नोंदणीला येणार का गती?
काही तालुक्यांमध्ये लागवड क्षेत्र कमी असल्याने तर काही तालुक्यात तूर काढणी सुरू असल्याने नोंदणीचे प्रमाण कमी आहे. एफएक्यू दर्जा, खरेदी केंद्रावर ताटकळण्याची वेळ, पेमेंट कधी मिळेल या बाबींमुळे नोंदणीचे प्रमाण सध्या कमी असले तरी शेवटच्या टप्प्यात नोंदणी वाढण्याची शक्यता आहे.
खुल्या बाजारात ५,२०० ते ५,६५०
खुल्या बाजारात आर्द्रता, दर्जानुसार ५ हजार २०० ते ५ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. नॉनएफएक्यू मालही खरेदी होत असल्याने व तात्काळ गरज म्हणून शेतकरी खुल्या बाजाराकडेही वळत आहेत.
तालुका -- नोंदणी संख्या
अंबाजोगाई -- ०७२
आष्टी, कडा -- २३१
बीड -- ५३७
कासारी आष्टी-- १६१
शिरूर घाट-- २२१
फुलसांगवी-- ००१
गेवराई -- २३७
घाटनांदूर-- ००५
माजलगाव --२४२
मंगरूळ-- १४
पारनेर--१८
पाटोदा -- ९२
परळी-- २४९
शिरूर -- ३०१
शिराळ-- ३२८
उमापूर-- ००७
या केंद्रांवर अद्याप नोंदणी नाही
बर्दापूर, धारूर