तुरीसाठी ३०९७ शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 11:42 PM2020-02-06T23:42:13+5:302020-02-06T23:43:04+5:30
शासनाच्या हमीदराने तूर खरेदीसाठी नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नोंदणी सुरु असून २६ दिवसात ३ हजार ९७ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून खरेदीची प्रतीक्षा आहे.
बीड : शासनाच्या हमीदराने तूर खरेदीसाठी नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नोंदणी सुरु असून २६ दिवसात ३ हजार ९७ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून खरेदीची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात ९ जानेवारीपासून तूरखरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र या नोंदणीसाठी शेतक-यांना खरीप हंगाम २०१९-२० मधील तूर पिकाचा पीक पेरा तलाठ्यांमार्फत मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाजपेयी, तलाठी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिका-यांची बैठक झाली. यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत माहिती देण्यात आली. शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. आधारकार्ड, बॅँक पासबुक झेरॉक्स, सातबारा तसेच पीक पेरा आवश्यक असल्याची व या चार दस्तऐवज असल्याशिवाय नोंदणी करू नये अशा सख्त सूचना असल्याची बाब जिल्हा मार्केटिंग अधिका-यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यावर चर्चा होऊन तलाठ्यांनी शेतक-यांना पीकपेरा प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान तूर खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी आहे.
पीक पे-याचा तिढा सुटला
पीक पेरा प्रमाणपत्राचा गैरवापर टाळण्यासाठी तलाठ्यांनी छापील नमुन्यातील प्रमाणपत्र न देता स्वहस्ताक्षरातच पीक पेरा प्रमाणपत्र हस्तलिखित सही, शिक्क्यानिशी द्यावेत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तलाठ्यांकडून पीक पेरा प्रमाणपत्र मिळू लालगल्याने हा तिढा सुटल्याने नोंदणीत वाढ झाली.