राज्यातील ३५२ आरोग्य संस्थांचा झाला ‘कायाकल्प’; राज्य सरकार देणार ५० लाखांपर्यंत बक्षिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 02:58 PM2020-10-21T14:58:56+5:302020-10-21T15:02:03+5:30
५० हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत हा बक्षीसरूपी निधी २५ आॅक्टोबरला वाटप केला जाणार आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील ३५२ आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प पुरस्कार’ देण्यात येणार आहे. ५० हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत हा बक्षीसरूपी निधी २५ आॅक्टोबरला वाटप केला जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहायक संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी हा निकाल जाहीर केला आहे.
राज्यात प्रत्येक वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, कुटीर रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार आरोग्य विभागाच्या वतीने दिला जातो. वर्षाच्या सुरूवातीला याची तपासणी करण्यात आली होती. याचा निकाल सोमवारी घोषित झाला असून जिल्हा रुग्णालय गटात नाशिक राज्यात अव्वल राहिले आहे. त्यांना ५० लाखांचे बक्षिस दिले जाणार असून द्वितीय मालेगाव रुग्णालयाला २० लाख रुपये दिले जाणार आहेत. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय गटात श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय अव्वल राहिले असून त्यांना १५ लाख रुपये तर द्वितीय तिरोरा उपजिल्हा व कसबाबावडा यांनी बाजी मारली आहे. त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षिस दिले जाणार आहे. इतर उत्तेजनार्थ संस्थांना प्रत्येकी १ लाख रुपये दिले जाणार आहेत.
आरोग्य केंद्र गटात यांची बाजी
राज्यातील २६९ आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. यात प्रथम असणाऱ्यांना २ लाख, तर इतरांना ५० हजार रुपये पारितोषिक दिले आहे. प्रथममध्ये कान्हूर पठार (जि. अहमदनगर), बाभूळगाव (अकोला), चापानेर (जि. औरंगाबाद), सालेभाटा (भंडारा), कडा (बीड), किन्होळा (बुलडाणा), दुर्गापूर (चंद्रपूर), कासारे (धुळे), माळेवाडा (गडचिरोली), छोपा (गोंदिया), पांगरा शिंदे (हिंगोली), शेंदुर्णी (जळगाव), अलाटे (कोल्हापूर), हालगारा (लातूर), बेला (नागपूर), तुपा (नांदेड), लहान शहादा (नंदुरबार), तळेगाव दिंडोरी (नाशिक), दहिफळ (उस्मानाबाद), तलवाडा (पालघर), महातपुरी (परभणी), पोयनाद (रायगड), कुंबळे (रत्नागिरी), चिंचाणी (सांगली), रेठारे बीके (सातारा), पडेल (सिंधुदुर्ग), कामटी (सोलापूर), शेनवा (ठाणे), अलीपूर (वर्धा), मनभा (वाशिम), आरली (यवतमाळ) यांचा समावेश आहे. इतर सर्वांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.