संपत्तीच्या वादातून नाते तुटले; सावत्र आईने कुऱ्हाडीने वार करून मुलाचे प्राण घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 05:12 PM2021-04-09T17:12:50+5:302021-04-09T17:14:09+5:30
या प्रकरणी 8 एप्रिल रोजी गेवराई पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई : तालुक्यातील लुखामसला येथील गायरान जमीनीच्या वादातून सावत्र आईने मुलाचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना 2 एप्रिल रोजी घडली होती. पांडुरंग भगवान डोमाळे ( 38, रा. लुखामसला ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी 8 एप्रिल रोजी गेवराई पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
पांडुरंग भगवान डोमाळे यास लुखामसला येथे गायरान जमिनीत जागा मिळाली होती. या जागेवरून पांडुरंगचा सावत्र भाऊ वैद्यनाथ डोमाळे व सावत्र आई रेणुका डोमाळे यांच्यात सतत वाद होत असत. 1 एप्रिल रोजी पाडुंरंग याने आपल्या गायरान जमिनीवर बाभळीचे काटे टाकले. यावरून वैद्यनाथ डोमाळे, रेणुका डोमाळे व योगेश वैद्यनाथ डोमाळे यांनी पांडुरंगसोबत वाद घातला. यानंतर डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्याला गंभीर जखमी केले होते. पांडुरंगला जखमी अवस्थेत बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान 2 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, 8 एप्रिल रोजी पांडुरंग याची पत्नी उर्मिला पांडुरंग डोमाळेच्या फिर्यादीवरून वैद्यनाथ डोमाळे, रेणुका डोमाळे व योगेश वैद्यनाथ डोमाळे यांच्याविरूद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तीनही आरोपी फरार आहेत. याचा पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक प्रफुल साबळे हे करीत आहेत.मयताच्या पश्चात पत्नी,दोन मुली एक मुलगा आहे.