डीसीसी बँकेतील व्यवस्थापकाचा नातेवाईक २० हजारांची लाच घेताना जाळ्यात

By सोमनाथ खताळ | Published: June 7, 2023 07:36 PM2023-06-07T19:36:13+5:302023-06-07T19:36:43+5:30

ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी डीसीसी बँकेसमोरील हॉटेलमध्ये केली.

Relative of manager in DCC bank caught by ACB team while taking bribe of 20 thousand | डीसीसी बँकेतील व्यवस्थापकाचा नातेवाईक २० हजारांची लाच घेताना जाळ्यात

डीसीसी बँकेतील व्यवस्थापकाचा नातेवाईक २० हजारांची लाच घेताना जाळ्यात

googlenewsNext

बीड : धनादेश वटविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी व्यवस्थापक शरद ठोंबरे यांच्यासह स्वत:साठी २० हजार रुपयांची लाच घेताना त्यांच्याच भावकीतील खासगी इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी डीसीसी बँकेसमोरील हॉटेलमध्ये केली.

बाळू ऊर्फ कल्याण बाबासाहेब ठोंबरे (वय ४५, रा. ढाकणेवाडी, ता. केज जि. बीड) असे या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार हे केज तालुक्यातील असून, त्यांनी सेवा सहकारी सोसायटी खेर्डा, ता. माजलगाव या संस्थेचे २००४ ते २०२३ पर्यंतचे वैधानिक लेखापरीक्षण केले होते. याचा मोबदला म्हणून संस्थेने त्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तालखेड, ता. माजलगाव येथे जमा केला. धनादेश वटवण्याकरिता शाखा प्रमुखाने सदर प्रकरण मध्यवर्ती बँकेकडे वर्ग केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी व्यवस्थापक शरद ठोंबरे यांचे नातेवाईक कल्याण ठोंबरे याने तक्रारदाराकडे धनादेश वटवण्यासाठी स्वत:करिता व व्यवस्थापक शरद ठोंबरे यांच्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली.

याची पडताळणी २० एप्रिल ते ७ जूनपर्यंत अनेकदा करण्यात आली. बुधवारी ठोंबरे याने पैसे घेऊन बँकेसमोरील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराला बोलावले होते. चहा पिणे झाल्यावर पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घालत त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलिस अंमलदार हनुमान गोरे, भारत गारदे, संतोष राठोड, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे आदींनी केली.

Web Title: Relative of manager in DCC bank caught by ACB team while taking bribe of 20 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.