देवाला सोडलेल्या १२ मुलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 03:45 AM2020-08-15T03:45:13+5:302020-08-15T03:45:17+5:30
बीडसह, लातूर, परभणी, सोलापूरमधील मुलांचा समावेश
बीड : अंधश्रद्धेपोटी देवाला सोडलेल्या ७ मुली व ५ मुले अशा १२ मुलांची सुटका करण्यात आली. ही मुले बीडसह, लातूर, परभणी, सोलापूरमधील रहिवासी आहेत. बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटावरील पोईच्या देवाजवळ शुक्रवारी दिवसभर हे ‘रेस्क्यू आॅपरेशन’ पार पडले.
बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटावर पोईचा देव म्हणून एक परिसर आहे. येथे कृष्ण मंदिर असून विविध १३ आश्रम आहेत. येथे महाराज लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. येथे आढळलेली व सध्या १५ वर्षांची असलेली सोलापूरची मुलगी सहा महिन्यांची असताना आई-वडिलांनी तिला या देवाच्या ठिकाणी आणून सोडले आहे. १५ दिवसांपूर्वी तिला नात्यातीलच एका ४० वर्षीय पुरूषाने फुस लावून पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. आठवड्यापूर्वी ती मुलगी त्याच्या तावडीतून सुटका करून परतली. पोलिसांनी तिला बालकल्याण समितीपुढे हजर केले. तिची अधिक चौकशी केली असता तिने आपल्याप्रमाणेच इतर मुलेही या आश्रमात असल्याचे सांगितले.
ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबविण्यात आले. यात त्यांना ७ मुली व ५ मुले आढळून आली. त्यांना बाल सुधारगृहात पाठविले जाईल, असे बालकल्याण समितीचे सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले.