'जलाशय ठेकेदार मुक्त करा'; माजलगावात भोई समाजाचे जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:58 PM2019-02-28T13:58:06+5:302019-02-28T13:58:54+5:30
मागील काही महिन्यांपासून स्थानिक मच्छिमार, भोई समाजाचा ठेकेदार व उपठेकेदार यांच्यासोबत वाद सुरु आहे.
माजलगाव (बीड ) :माजलगाव जलाशय ठेकेदार मुक्त करून स्थानिक भोईसमाज व मच्छिमारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मच्छिमार संघर्ष कृती समितीच्यावतीने आज, गुरुवारी सकाळी ११:०० वाजल्यापासून सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे.
माजलगांव जलशयावर परंपरागत स्थानिक भोई समाज मासेमारी करत असुन मागील काही महिन्यांपासून स्थानिक मच्छिमार, भोई समाजाचा ठेकेदार व उपठेकेदार यांच्यासोबत वाद सुरु आहे. यासंदर्भात भोई समाजाकडून नेहमीच वेगवेगळे आंदोलने करण्यात आली आहेत.परंतु संबंधित आंदोलनाची कुठलीही दखल न घेता दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे निगरगट्ट प्रशासनाला जाग आणण्यासाठी समाजाने भोई समाज आणि मच्छीमार संघर्ष समितीच्यावतीने जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.
आंदोलनात मच्छिमार संघर्ष समितीचे अध्यक्ष भीमा गहिरे, रामनाथ कुंबळे, गणेश परसे, ज्ञानेश्वर कचरे, कैलास भुंगाठे, बंडू मंजरे, सतीश चूनारे, तानुबाई कचरे अनुसया घुंगाटे आदींचा समावेश आहे. तसेच मच्छिमार भोई समाज महिला, मुले आणि वृद्धांसह सामील झाला आहे. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जलाशयावर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
या आहेत मागण्या :
मच्छिमारांवरील खोट्या केसेस मागे घेण्यात याव्यात,माजलगांव जलाशयाचा सन २०१९ ते २०२० पर्यंतचा मासेमारी तलाव ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा,मच्छिमारावर अन्याय करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ अटक करण्यात यावी,माजलगांव जलाशयात खोटे गुन्हे दाखल करुन घेणाऱ्या पोलीस अधिकार्यांना निलंबीत करण्यात यावे.