येडशी ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 04:07 PM2019-03-09T16:07:31+5:302019-03-09T16:08:24+5:30
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले लोकार्पण
बीड : गेवराई येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गातील येडशी ते औरंगाबाद या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण आणि बोरगाव देवगाव ते लासूर स्टेशन, पैठण ते शहागड रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमीपूजन झाल्याचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी सकाळी जाहीर केले.
गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लोकार्पण सोहळ्यासाठी गेवराई येथे येणार होते. परंतु, त्यांचा हा नियोजित दौरा स्थगित झाला होता. या निमित्ताने बंजारा मेळाव्याचेही आयोजन केले होते. मराठवाड्याच्या रस्ते विकासासाठी ६१ हजार कोटींची मंजुरीही त्यांनी यावेळी दिली. नदी जोडप्रकल्प राबवून आगामी काळात जायकवाडी धरणातील पाणीसाठा जास्तीत जास्त वाढविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्री पकंजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.जयदत्त क्षीरसागर, आ.सुरेश धस, आ.संगीता ठोंबरे, आ.आर.टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, रमेश आडसकर, आदींची उपस्थिती होती.