शेतकऱ्यांना दिलासा, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, सिंचनाचा प्रश्न सुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 04:40 PM2022-05-11T16:40:05+5:302022-05-11T16:40:30+5:30
मांजरा धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी आग्रही मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती.
अंबाजोगाई (बीड): धनेगाव येथील मांजरा धरणाचे सहा दरवाजे आज बुधवारी (दि. ११) सकाळी ८ वाजता ०.२५ मीटरने उचलण्यात आले असून त्याद्वारे नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८ पर्यंत विसर्ग सुरु राहणार असून पाच उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये एकूण ११.४७ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.
मांजरा धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी आग्रही मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. १८ मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही सिंचनासाठी पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरणा केल्यानुसार बुधवारी मांजरा धरणातून नदीवरील लासरा, टाकळगाव देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा पोहरेगाव या पाच बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती लातूर लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली होती.
त्यानुसार बुधवारी सकाळी ८ वाजता धरणाचे सहा दरवाजे ०.२५ मीटरने उचलण्यात येऊन विसर्ग सुरु करण्यात आला. गुरुवारी सकाळी ८ पर्यंत विसर्ग सुरु राहणार असून पाच उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये एकूण ११.४७ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. याचा फायदा मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या नदीपात्राच्या दोन्ही काठावरील जवळपास २५ गावांना होणार आहे. या भागातील पाणी, जनावरांच्या पाण्याच्या व सिंचनाचा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, पाणी सोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मांजरा नदी काठावरील शेतकरी, ग्रामस्थ यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.