वृद्धांना उतारवयात दिलासा; लवकरच सुरु होणार स्वतंत्र दवाखाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 02:48 PM2019-12-18T14:48:40+5:302019-12-18T14:50:39+5:30
पुणे व औरंगाबादमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : वृद्धापकाळात वाढते आजार, काही वेळा कुटुंबाकडून होणारे दुर्लक्ष, रुग्णालयांतील गर्दी आदी मुद्दे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने वृद्धांसाठी नव्या वर्षात स्वतंत्र क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालयात ही सुविधा असणार आहे.
पुणे व औरंगाबादमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. राष्ट्रीय वृद्धापकालीन आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वृद्धांसाठी विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. जिल्हा, उपजिल्हा, स्त्री, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. याच आरोग्य संस्थांमध्ये विशेष वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच सर्वांना याबाबत जिल्हा स्तरावर प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी पाच व पुरूषांसाठी पाच असे १० बेड असणार आहेत. रोज नियमित तपासणी (ओपीडी) असणार आहे. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आठवड्यातून दोन दिवस, प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवस तपासणी होईल. उपकेंद्र स्तरावर डॉक्टर, परिचारिकांमार्फत आढावा घेऊन वृद्धांवरील उपचारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
चंद्रपूरला यशस्वी प्रयोग
यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धांसाठी प्रायोगिक तत्त्वावर क्लिनिक सुरू केले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
बीड जिल्ह्यात होणार अंमलबजावणी
जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ठिकाणी वृद्धांसाठी विशेष तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यासाठी आमचे पथक प्रशिक्षण घेऊन आले आहे. जिल्ह्यातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात प्रशिक्षण दिले जाईल. लवकरच बीड जिल्ह्यात याची अंमलबजावणी करणार आहोत.
-डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड