पाच दिवसांनंतरही मिळेना रेमडेसिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:42 AM2021-04-30T04:42:45+5:302021-04-30T04:42:45+5:30
माजलगाव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी लागणा-या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करून पाच दिवस उलटले असताना मिळत नसल्याने नातेवाइकांना काळ्याबाजारातून विकत घेण्याची ...
माजलगाव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी लागणा-या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करून पाच दिवस उलटले असताना मिळत नसल्याने नातेवाइकांना काळ्याबाजारातून विकत घेण्याची वेळ येत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने वितरण नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात एका ठिकाणी मागणी करणाऱ्यांना आपली कागदपत्रे जिल्ह्याच्या ठिकाणी दिल्यानंतर त्यांना उपलब्धतेनुसार ते देण्यात येत होते. परंतु, कागदपत्रे बीड येथे जमा करून परत हे इंजेक्शन आणण्यासाठी ग्रामीण भागातून व तालुक्याच्या ठिकाणावरून येण्यात नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये ज्यांना इंजेक्शनची आवश्यकता आहे, त्यांना याच ठिकाणावरून हे इंजेक्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली.
माजलगाव तहसील कार्यालयात २५ एप्रिल रोजी १४ जणांनी, तर २६ एप्रिल रोजी ३४ जणांनी नावनोंदणी केली होती. पाच दिवस उलटूनही नातेवाइकांना रेमडेसिविर मिळत नसल्याने नातेवाइकांत नाराजीचा सूर पसरला असून रुग्णांची तब्येत खालावत असल्याने नातेवाइकांवर काळ्याबाजारातून हे इंजेक्शन खरेदी करण्याची वेळ येत आहे.
गुरुवारी रात्री वरिष्ठांकडून नोंद केलेल्यांचे रेमडेसिविर मिळणार असून ते शुक्रवारी सकाळी संबंधितांना देण्यात येणार आहेत. माजलगावला ५० रेमडेसिविर मिळणार आहेत.
- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव