मृत्यूनंतर मिळते रेमडेसिविर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:31 AM2021-05-15T04:31:58+5:302021-05-15T04:31:58+5:30
१२ मेपर्यंत ९५४ रुग्णांची नोंद, मिळाले फक्त ३२९ माजलगाव : येथे कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन मागणी नोंदविल्यानंतर ...
१२ मेपर्यंत ९५४ रुग्णांची नोंद, मिळाले फक्त ३२९
माजलगाव : येथे कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन मागणी नोंदविल्यानंतर दहा दिवसांनी मिळत असल्याने या काळात अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. दरम्यान, मृत्यूनंतर इंजेक्शन प्राप्त होत असून, नंतर आलेले हे इंजेक्शन कोठे जातात याविषयी चर्चा होत आहे.
कोरोना रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा उपयोग सध्या महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे, तर दुसरीकडे शासकीय पुरवठा मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. तहसील कार्यालयात रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शनची मागणी नोंदवावी लागते. त्यानंतर वेटिंग लिस्ट लागते व त्याप्रमाणे इंजेक्शन मिळते, अशी परिस्थिती आहे. रुग्णास इंजेक्शन द्यावे लागणार, असे सांगताच इंजेक्शन नोंदणी केली जाते. मात्र, तब्बल दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. वेळेवर ते उपलब्ध होत नसल्याने या काळात अनेक रुग्ण दगावले. या दरम्यान अनेक नातेवाइकांनी ३० पासून ७० हजार रुपयांपर्यंत रेमडेसिविर विकत आणून रुग्णांना दिले. मात्र, दहा दिवसांनी नोंदणी केलेले इंजेक्शन मिळत असतील तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्न नातेवाइकांतून केला जात आहे.
माजलगाव येथील तहसील कार्यालयात २३ एप्रिलपासून १२ मेपर्यंत ९५४ रुग्णांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून २ मेपर्यंत नोंदणी केलेल्यांचेच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. १२ मेपर्यंत केवळ ३२९ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले.
दरम्यान, मृत्यूनंतर त्या रुग्णांच्या नावावर आलेले इंजेक्शन काय केले जाते, याचे गौडबंगाल आहे. शासनाकडे परत केले जाते की इतर कोठे जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-------
रेमडेसिविर इंजेक्शन जातात कुठे ?
माजलगाव तालुक्यात असलेल्या कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.नोंदणी केलेले रेमडेसिविर इंजेक्शन १० दिवसांनंतर उपलब्ध होत आहे. तोपर्यंत संबंधित रुग्ण दगावतो किंवा रेफर केला जातो किंवा सुटी मिळाल्यानंतर घरी येतो. मात्र, त्यांनी नोंदणी केलेले इंजेक्शन आल्यानंतर त्यांना दिले जात नाही, किंवा जिल्हा आरोग्य विभागाकडे त्या नावाचे इंजेक्शन परत जमा देखील केलेले नाहीत. मग हे इंजेक्शन जातात कुठे, याची देखील चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत रुग्णांच्या नातेवाइकांतून व्यक्त होत आहे.
-------
आम्ही इंजेक्शन नोंदणीची माहिती आरोग्य विभागास पाठवतो. त्यास मंजुरी मिळून ते ग्रामीण रुग्णालयात पाठवले जाते. रुग्ण मृत्यूनंतर किंवा रुग्ण डिस्चार्ज-रेफर झाल्यावर त्याच्या नावाचे शिल्लक इंजेक्शन परत आरोग्य खात्याकडे पाठवायला पाहिजे, असा शासनाचा आदेश आहे.
- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव.
-----
रेमडेसिविर इंजेक्शन वरूनच कमी येत आहेत. त्यामुळे आम्हाला वाटपास अडचणी येत आहेत. शिल्लक इंजेक्शन वेटिंग लिस्टप्रमाणे रुग्णांना देण्यात येतात.
-डॉ. सुरेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव.