जिल्हा रुग्णालयात रेमडेसिविरचा पुन्हा काळाबाजार; इंजेक्शन दिले एक अन् नोंद पाचची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:15+5:302021-08-14T04:39:15+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयातील उपचाराबद्दल तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसेच एका वृद्धाला १२ दिवसांत केवळ एकवेळेस सलाईन लावली, तर ...
बीड : जिल्हा रुग्णालयातील उपचाराबद्दल तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसेच एका वृद्धाला १२ दिवसांत केवळ एकवेळेस सलाईन लावली, तर एकदा रुग्णाच्या मुलाकडून रेमडेसिविर इंजेक्शन दिल्याची स्वाक्षरी घेतली. त्यानंतर ना सलाईन लावले ना सही घेतली. परंतु, कागदोपत्री पाच इंजेक्शन दिल्याची नोंद आहे. यावरून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे दिसत असून, नातेवाइकांनी चौकशीची मागणी केली आहे.
बीड तालुक्यातील आंबीलवडगाव येथील भीमराव खराडे हे २ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याने आणि धाप लागत असल्याने त्यांना संशयित वॉर्डात दाखल केले. तेव्हापासून आतापर्यंत खराडे यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. उपचारासाठी आतापर्यंत केवळ दोन वेळा सलाईन लावली. त्यातही एकवेळा आऊट गेली. तेव्हाही कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शन देताना नातेवाईक अथवा रुग्णाची सही अथवा अंगठा घेणे बंधनकारक आहे. परंतु, खराडे रुग्णाबाबत मुलगा भाऊसाहेब यांची केवळ एकचवेळेस सही घेतली. त्यानंतर सही घेतलीच नाही, तर दुसऱ्या बाजूला भीमराव खराडे यांना पाच इंजेक्शन दिल्याची नोंद आहे. यावरून पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयात इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जाेर धरू लागली आहे.
---
रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा मुबलक आहे. रुग्णाला इंजेक्शन दिल्याची स्वाक्षरी एकदाच घेतली जाते. मी माहिती घेतली असता पाचही इंजेक्शन दिलेले आहेत. तरीही मी थोडी खात्री करतो.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
---
१२ दिवसांपासून माझे वडील उपचार घेत आहेत. आतापर्यंत दोनच वेळा सलाईन लावली. त्यातही एकवेळा आऊट गेली. तरीही लक्ष दिले नाही. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनबाबत केवळ एकदाच स्वाक्षरी घेतली. कागदावर मात्र, पाच इंजेक्शनची नोंद आहे. याची चौकशी करून उपचारांकडे लक्ष द्यावे.
भाऊसाहेब खराडे, रुग्णाचा मुलगा