Raj Thackeray: परळीत गोपीनाथ मुंडेंची आठवण, राज ठाकरेचं गोपीनाथ गडावर अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 05:26 PM2023-01-18T17:26:09+5:302023-01-18T17:27:43+5:30

सन २००८ मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती.

Remembering Gopinath Munde in Parli, Raj Thackeray's greeting at Gopinath Fort | Raj Thackeray: परळीत गोपीनाथ मुंडेंची आठवण, राज ठाकरेचं गोपीनाथ गडावर अभिवादन

Raj Thackeray: परळीत गोपीनाथ मुंडेंची आठवण, राज ठाकरेचं गोपीनाथ गडावर अभिवादन

googlenewsNext

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट परळी कोर्टाने आज रद्द केले. सन २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांना कोर्टाने अटक वॉरंट बजावले होते. आज सकाळी राज ठाकरे स्वतः परळी कोर्टात हजर झाले. यावेळी कोर्टाने पाचशे रुपयांचा दंड बजावून त्यांच्यावरील अटक वॉरंट रद्द केल्याची माहिती अ‍ॅड. अर्चित साखळकर यांनी दिली. तत्पूर्वी, राज ठाकरेंनी परळीतील गोपीनाथ मुंडें यांच्या समाधीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी, परळीत मनसैनिकांकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. राज यांनी गोपीनाथ मुंडेंच्या अभिवादनासाठी जाणार असल्याचं अगोदरच जाहीर केलं होतं. 

सन २००८ मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्शीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले. आज राज ठाकरे स्वतः परळी न्यायालयात हजर राहिले. या दौऱ्यात राज ठाकरेचं झालेलं जंगी स्वागत आणि परळीतील गोपीनाथ गडावर त्यांनी केलेले अभिवादन चर्चेचा विषय ठरला. 

दिवंगत गोपीनाथ मुंडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते, त्यातच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही त्यांचा स्नेहबंध होता. त्यातूनच, राज ठाकरे यांच्याशीही त्यांची मैत्री होती. म्हणून, जुन्या आठवणींना उजाळा देत आणि गोपीनाथ मुंडेंच्या जन्मभूमीत आल्यामुळे राज ठाकरे गोपीनाथ गडावर पोहोचले. येथे गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत अभिवादन केले.   


दरम्यान, कोरोना काळ, त्यानंतर झालेली सर्जरी, तब्येतीमुळे लांबचा प्रवास करण्यास असमर्थ ठरल्याने न्यायालयात हजर राहता आले नाही असा अर्ज ठाकरे यांच्याकडून वकिलांनी न्यायालयात दाखल करण्यात आला. यावरून कोर्टाने त्यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट रद्द केले. राज ठाकरे यांच्यासोबत मुंबईचे अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर,अ‍ॅड. अर्चित साखळकर, अ‍ॅड. अरुण लंबुगोळ पुणे तर परळी येथील हरिभाऊ गुट्टे होते.

Web Title: Remembering Gopinath Munde in Parli, Raj Thackeray's greeting at Gopinath Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.