गाळ काढताना इंग्रज अधिकाऱ्याच्या ७९ वर्षांपूर्वी पडलेल्या विमानाचे अवशेष सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:24 PM2019-05-27T15:24:53+5:302019-05-27T15:29:45+5:30
१९४० मध्ये परिसराची पाहणी करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याच्या विमानास दुर्घटना झाली होती
आष्टी (जि. बीड) : तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या रु टी ईमननगाव येथील तलावात ७९ वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेतील विमानाचे अवशेष रविवारी दुपारी आढळून आल्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते रितसर कार्यालयात जमा केले.
१९४० मध्ये इंग्रज अधिकारी पाहणी करत होते. वैमानिकासह दोन अधिकारी असे तिघे विमानातून जात असताना अचानक विमानात बिघाड झाला. विमानाने पलट्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी वैमानिकाने ते विमान तलावात पाडले. या दुर्दैवी अपघातात विमानातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तलावात भरपूर पाणी आणि गाळ असल्याने व पुरेशा साधनांअभावी विमान बाहेर काढता आले नाही.
सध्या दुष्काळामुळे तलावात पाणी नसल्याने शेतकरी पोकलेन व जेसीबीद्वारे गाळ काढण्याचे काम करत होते. रविवारी दुपारी ७ ते ८ फूट खोलपर्यंत पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरु होते. तीन वाजेच्या दरम्यान अचानक विमानाचे अवशेष गाळात सापडले. सापडलेले अवशेष हे विमानाचे इंजिन असल्याची चर्चा होती. ते पाहण्यासाठी गावातील नागरिक टॅक्टर व डंपरचे चालकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मागील दोन वर्षांपूर्वी सुद्धा जे.सी.बी.च्या साहाय्याने तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु असताना काही प्रमाणात विमानाचे अवशेष सापडले होते. आष्टी पाटबंधारे उपविभाग कॅनॉल निरीक्षक ज्योती नवले, कर्मचारी सुभाष तावरे यांनी रुटी ईमगाव तलावावर जाऊन ताब्यात घेतले व पाटबंधारे कार्यालयात जमा केले.