बीडमध्ये भंडाऱ्याची पुनरावृत्ती टळली, नर्सेसची सतर्कता; वाचले १२ बाळांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:00 PM2021-12-17T12:00:27+5:302021-12-17T12:01:06+5:30
वॉर्मरच्या सॉकेटमधून धूर
सोमनाथ खताळ
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील आगीची मोठी दुर्घटना दोन परिचारिकांच्या सतर्कतेने टळली. वॉर्मरमधून निघणाऱ्या धुराकडे लक्ष दिल्याने सर्व वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे एसएनसीयूमधील सर्वच १२ बालके सुखरूप राहिली. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
एसएनसीयू विभागात अनिता मुंडे व पुष्पा माने या दोघी परिचारिका कर्तव्यावर होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बालरोगतज्ज्ञ डॉ. इलियास खान यांनी सर्व बाळांची तपासणी केली. त्यानंतर परिचारिका बाळाला आईकडून आलेले दूध पाजत होत्या. एवढ्यात त्यांना काहीतरी जळाल्याचा वास आला. यातील अनिता मुंडे यांनी पाहिल्यावर त्यांना पहिल्या क्रमांकाच्या वाॅर्मरमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी पुष्पा माने यांना आवाज दिला. यातील मुंडे यांनी बाळाला बाजूला केले तर माने यांनी सर्व वीजपुरवठा खंडित केला.
त्यामुळे वॉर्मरमधील धूर बंद झाला. तोपर्यंत ही माहिती अधिकाऱ्यांसह तंत्रज्ञांना देण्यात आली. यावर सर्वांनीच एसएनसीयूकडे धाव घेतली. रात्री आठ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यानंतर तंत्रज्ञांनी कसब पणाला लावत सर्व वॉर्मर युद्धपातळीवर पुन्हा सुरळीत केले. सर्व बालके सुरक्षित आणि सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनिता मुंडे व पुष्पा माने यांच्या धाडसाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दोघींचा सत्कार केला.
बांधकाम विभाग गाफीलच
जिल्ह्यातील सर्वच शासकीय आरोग्य संस्थांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट झालेले आहे. त्यातील उपाययोजना करण्याबाबत आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाला पत्रही दिलेले आहे. परंतु, येथील अभियंता केवळ कागदी घोडे नाचवून सामान्यांच्या जीवाशी खेळत आहेत. वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप काहीच उपाययोजना न केल्याने संताप व्यक्त होत आहे. बांधकाम अभियंत्यांवरच आता कारवाईची मागणी होत आहे.