महसूल कर्मचाऱ्यांची विनंती बदल्यांचा प्रस्ताव फेटाळला - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:34+5:302021-09-02T05:11:34+5:30
बीड : जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांवरून वाद निर्माण झाला होता. तो वाद अद्याप शमला नसतानाच आता जिल्हा प्रशासनाने ...
बीड : जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांवरून वाद निर्माण झाला होता. तो वाद अद्याप शमला नसतानाच आता जिल्हा प्रशासनाने केलेल्या विनंती बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी फेटाळला. महसूल विभागात झालेल्या प्रशाकीय बदल्यांवरून अद्यापही वाद आहेत. जिल्हा प्रशासनाने यातील काही बदल्यांमध्ये अंशतः बदल केल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांनी इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट ) धाव घेतली होती. दरम्यान, शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने १४ कारकून, १२ अव्वल कारकून, ६ मंडळ अधिकारी व १ शिपाई अशा विनंती बदल्या केल्या होत्या. या बदल्यांना विभागीय आयुक्तांची मान्यता आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. मात्र, या बदल्यांना विभागीय आयुक्तांनी मान्यता नाकारली असून हा प्रस्ताव अमान्य करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. यामुळे विनंती बदल्या होतील असे वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.