कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ४० वासरांसह पाच जनावरांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 07:40 PM2024-02-06T19:40:13+5:302024-02-06T19:41:07+5:30
आष्टी पोलिसांची खडकत येथे मध्यरात्री धाड
- नितीन कांबळे
कडा: गोपनीय माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकून आष्टी तालुक्यातील खडकत येथून ४० नवजात वासरांसह पाच जनावरांची सुटका केली. याप्रकरणी दोन जणांविरूध्द आष्टी पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहेत.
आष्टी तालुक्यातील खडकत येथील एका ठिकाणी काही जनावरे बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्याची माहिती आष्टी पोलिसांना सोमवारी मिळाली. यावरून पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने खडकत येथे सोमवारी मध्यरात्री धाड टाकली. पोलिसांनी येथून ५ जनावरांसह नवजात ४० वासरांची सुटका करत १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पाच जनावरांसह ४० वासरांना अहमदनगर जिल्ह्यातील राशिन येथील यशोदानंदा गोशाळेत दाखल करण्यात आली आहेत.
याप्रकरणी मंगळवारी पहाटे पोलीस अंमलदार अशोक तांबे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात आरोपी जमिल बशीर पठाण, मुतंजीर आबिद कुरेशी ( रा.खडकत ) या दोघांवर प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११ सहकलम ५,९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर करीत आहेत. ही कारवाई आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, पोलीस अंमलदार अशोक तांबे,चालक दादासाहेब भगत यांनी केली.