कत्तलीसाठी जाणाऱ्या १३ बैलांची सुटका; बीड ग्रामीण पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:11 AM2018-10-10T00:11:23+5:302018-10-10T00:12:56+5:30
रात्रीच्या गस्त घालणाºया बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका ट्रकमधून हैदराबादकडे कत्तलीसाठी नेण्यात येणाºया तेरा बैलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास गेवराई - बीड रोडवर करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : रात्रीच्या गस्त घालणाºया बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका ट्रकमधून हैदराबादकडे कत्तलीसाठी नेण्यात येणाºया तेरा बैलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास गेवराई - बीड रोडवर करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून मुश्ताक नामक व्यक्तीने कत्तल करण्याच्या उद्देशाने तेरा बैलांची खरेदी करून त्यांना ट्रकमध्ये (एमएच ०४ ईवाय १८०) घालून हैदराबादकडे पाठविले असल्याची गुप्त माहिती बीड ग्रामीण पोलिसांच्या गस्ती पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बीड - गेवराई मार्गावर रामनगर येथे नदी पुलावर सापळा रचला. त्यानंतर पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास एक ट्रक संशयास्पद रीतीने गेवराईकडून बीड कडे येताना पोलिसांना दिसून आला. नंबरच्या आधारे टीप मिळालेला हाच ट्रक असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यास अडविले. ट्रकच्या मागील बाजूची ताडपत्री काढून झडती घेतली असता आतमध्ये तेरा बैल आढळून दाटीवाटीने कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याने सदरील बैल मालेगाव येथील मुश्ताक याने खरेदी केले असून ते मी हैदराबादला कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले.
पोलिसांनी बैल आणि ट्रक असा एकूण सव्वा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी चालक अहमद मोहम्मद सलीम (रा. मंगळवार वार्ड, मालेगाव, जि. नाशिक) याला ताब्यात घेऊन पोलीस कर्मचारी राजाभाऊ गर्जे यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलूबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे, पोलीस कर्मचारी राजाभाऊ गर्जे, सचिन सिद्धेश्वर, भागवत शेलार आणि चालक रशीद खान यांनी पार पाडली
जनावरे चोर जेरबंद; दरोडा प्रतिबंधक पथकाची कामगिरी
धारूर तालुक्यातील आमला येथील शेतकºयाचे बैल चोरीला गेल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या चोरीचा दरोडा प्रतिबंधक पथाने दहा दिवसात छडा लावला.
२८ सप्टेंबर रोजी आमला येथील शेतकरी मधुकर रामकिसन सोळुंके यांच्या गोठ्यातून दोन बैल चोरी झाले होते. याबाबत सिरसाळा पोलिसांनी सदरील बैल चोरून नेत असलेल्या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर चोरट्यांनी बैलासह वाहन जागेवर सोडून पळ काढला होता.
रविवारी दरोडा प्रतिबंधक पथकाला चोर उमापूर फाटा येथील असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हॉटेलातून बप्पासाहेब पंडित कोळेकर आणि रमेश होणाजी सावंत (दोघेही रा. रामनगर तांडा, ता. गेवराई) यांना जेरबंद केले. ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव, कर्मचारी राजाभाऊ नागरगोजे, संजय खताळ, प्रकाश वक्ते, श्रीमंत उबाळे, नारायण साबळे यांनी पार पाडली.