रहिवासी अंबाजोगाईचे , लायसन परदेशातले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:07+5:302021-07-11T04:23:07+5:30
अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : शिक्षण, नोकरी, उद्योग, पर्यटन आदी कारणांसाठी परदेशात जाणारे बीड जिल्ह्यातील रहिवाशी अंबाजोगाई येथील प्रादेशिक ...
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : शिक्षण, नोकरी, उद्योग, पर्यटन आदी कारणांसाठी परदेशात जाणारे बीड जिल्ह्यातील रहिवाशी अंबाजोगाई येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून इंटरनॅशनल लायसन्स काढून नेतात. गेल्या सहा वर्षात परदेशी परवाना घेऊन जाणाऱ्यांची संख्या २२ आहे.
बदलत्या काळानुसार आता परदेश वारी करणे अत्यंत सोपी बाब झाली असून देशातील कित्येक नागरिक आता फिरण्यासाठी म्हणूनही परदेशात जाऊन येतात. फिरण्यासाठी जाणाऱ्यांना काही दिवसांसाठी जायचे असल्याने ते काही दिवसांचा व्हिसा घेतात व परत येतात. मात्र, आता कित्येक भारतीयांचे परदेशात ही उद्योगधंदे असून ते आपल्या कामानिमित्त कित्येक दिवसांसाठी परदेशात मुक्कामी जातात. याशिवाय शिक्षणासाठी ही देशातील कित्येक विद्यार्थी परदेशात जात असून त्यांचा कित्येक वर्षाचा मुक्काम तेथेच असतो. अशात या उद्योगपती तसेच विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. त्यांच्या सोयीसाठी आता येथूनच इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात आहे. यामुळे अशा व्यक्ती आता येथूनच हे लायसन्स घेऊन परदेशात जात आहेत. यासाठी त्यांना संबंधित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मागणी करावी लागते. अंबाजोगाईच्या कार्यालयातून अशा २२ व्यक्तींनी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून मागील ६ वर्षात इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली आहे.
मुदत एक वर्षाची
सामान्यत: इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत एक वर्षाची असते. कारण बहुतांश व्हिसा एक वर्षासाठी दिला जातो. अशात संबंधित व्यक्तीचा व्हिसा संपल्यास लायसन्सची ही मुदत संपते.
याशिवाय काही व्यक्ती जास्त कालावधी किंवा शिक्षणासाठी जात असल्याने एक वर्षानंतर पाच वर्षासाठी किंवा त्यांचा व्हिसा कधी संपतो यानुसार त्यांना लायसन्स दिले जाते.
ही लागतात कागदपत्रे
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येथील ड्रायव्हिंग लायसन्स, एक हजार रुपये फी, ३ पासपोर्ट आकाराचे फोटो, मेडिकल सर्टीफिकेट, संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट तसेच मिळालेल्या व्हिसाचा पुरावा सादर करावा लागतो. त्यानुसार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून संपूर्ण प्रक्रिया करून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. शिवाय संबंधित व्यक्ती किती कालावधीसाठी परदेशात जात आहे हे बघून त्यांना लायसन्स दिले जाते.
सामान्यतः जास्त कालावधीकरिता परदेशात राहण्यासाठी जाणाऱ्यांकडून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली जाते. यात ज्यांचे परदेशात उद्योगधंदे व नोकरी आहे किंवा शिकण्यासाठी जात असलेल्यांकडून मागणी आहे. विशेष म्हणजे, यातही ज्यांची आर्थिक स्थिती बरी आहे त्यांच्याकडूनच इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली जाते. अंबाजोगाई विभागात मागील ६ वर्षात २२ प्रकरणे आली असून आपल्या विभागात ही बाब अत्यल्प आहे.
-दत्तात्रय सांगोलकर
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई.
आपल्या कार्यालया अंतर्गत किती जणांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढले आहे ?
२०१५ -१
२०१६ -८
२०१७ -२
२०१८ -१
२०१९ -५
२०२० -५
२०२१ (जूनपर्यंत) -०