रेल्वे भूसंपादनाच्या तक्रारी आठवड्यात सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:22 AM2021-06-29T04:22:41+5:302021-06-29T04:22:41+5:30
आष्टी : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील अतिरिक्त संपादनातील घरे, विहीर, फळबाग, पाइपलाइनसारख्या बाबींची शहानिशा करून शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावा. रेल्वेसह ...
आष्टी : अहमदनगर-बीड-परळी
रेल्वे मार्गावरील अतिरिक्त संपादनातील घरे, विहीर, फळबाग, पाइपलाइनसारख्या बाबींची शहानिशा करून शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावा. रेल्वेसह महसूल, कृषी अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन पाहणी करून शेतकऱ्यांचा मावेजा वर्ग करावा. एका खात्याने दुसऱ्या खात्याकडे बोट न दाखवता, ठरवून दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करण्याचे निर्देश खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी दिले.
नगर-बीड- परळी रेल्वेमार्गासाठी संपादित जमिनीच्या मावेजासंदर्भात येथील तहसील कार्यालयात सोमवारी बैठक झाली. यावेळी आ.बाळासाहेब आजबे,माजी. आ.भीमसेन धोंडे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजाभाऊ कदम, सविता, गोल्हार, ॲड.वाल्मिक निकाळजे, विजय गोल्हार, सभापती सुवर्णा लाबरूड, शंकर देशमुख, शैलेजा गर्जे, अशोक पोकळे, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे, अंकुश नागरगोजे, संदीप नागरगोजे उपस्थित होते.
खा.मुंडे म्हणाल्या, फळबाग, घरे, विहिरींच्या मावेजाचे प्रश्न पुढील १ महिन्याच्या आत मार्गी लागावेत, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्यात बोगस नोंदी करू नयेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी तिन्ही खात्यांच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ १५ दिवसांमध्ये मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रेल्वे मार्गाचे ४४ हेक्टर भूसंपादन राहिले असून, सर्वात जास्त आष्टी तालुक्यात राहिले आहे. हा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावावा. कोरोनाच्या काळात प्रशासनावर जबाबदारी आहे. नियोजनबद्ध कार्यक्रम लावून रेल्वे, भूसंपादन, कृषी अधिकाऱ्यांनी ऑन द स्पाॅट पाहून ८ दिवसांत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी रेल्वे ब्रीज ऑप्शन रोड हे अत्यंत निकृष्ट व लेवलमध्ये न केल्याने जाण्या-येण्याची अडचण निर्माण झाल्याची तक्रार करताच, ऑप्शन रोड दुरुस्त करण्याच्याही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या आढावा बैठकीत उपस्थित रेल्वेचे संबंधित अधिकारी मग्रुरीने बोलत असल्याचे दिसताच, त्यांना खा.मुंडे यांनी चांगलेच झापले. यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
चौकट
रेल्वेसाठी नागरिकांचा विरोध नाही, काम गैरप्रकारामुळे लांबणीवर पडत आहे.
शेतकऱ्यांच्या बोगस विहिरी, फळबाग, घरांची नोंद केल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे रेल्वे येण्यासाठी वेळ लागत आहे. सोलापूरवाडीपर्यंत टेस्टिंग झाली आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेत, तत्काळ सोडविल्या, तर थोड्याच दिवसांत रेल्वेचे काम पूर्ण होईल.
- बाळासाहेब आजबे, आमदार.
रेल्वेसाठीचे भूसंपादनाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे रेल्वेचे काम रखडले आहे. आष्टीपर्यंत रेल्वे येण्यास काम जलदगतीने केल्यास अडचण नाही. शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मावेजा द्यावा.
- भीमसेन धोंडे, माजी आमदार.
रेल्वे मार्ग कामाची पाहणी
सोमवारी खा.डॉ.प्रीतम मुंडे व माजी आ.भीमसेन धोंडे यांनी अहमदनगर- बीड - परळी या रेल्वेमार्गाचे आष्टी तालुक्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून आष्टी (चिंचाळा) येथील रेल्वे स्टेशन कामाची पाहणी केली.
===Photopath===
280621\img-20210628-wa0312_14.jpg~280621\img-20210628-wa0273_14.jpg