जात, धर्म, भाषा शिबीर, मेळावे, मोर्चा अन् उपोषणावर निर्बंध...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:16 AM2019-09-23T00:16:20+5:302019-09-23T00:16:25+5:30
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, नसता कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, नसता कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला.
अचारसंहिता कालावधीमध्ये जिल्ह्यात कसल्याही प्रकारच्या जात, भाषा, धार्मिक शिबिरांच्या, मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या कालावधीत जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारात कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील आवाराचा वापर राजकीय कामांसाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कट आऊट, पेंटीग्स, होर्डिंग्ज लावता येणार नाहीत. धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे.
प्रचार वाहनावर कापडी फलक, झेंड्याला बंदी
विधानसभा निवडणूक प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाºया वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे इत्यादी बाबींवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत. तसेच फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या वाजूने लावण्यात यावा. यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यासही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
निवडणूक प्रचार मोहिमेच्या कालावधीत ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाºयांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.
सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तीने निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. हे निर्बंध निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत घालण्यात आले आहेत.