३५ वर्षांच्या आतील महिलेचे गर्भाशय काढण्यावर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 03:23 AM2019-09-24T03:23:50+5:302019-09-24T03:23:57+5:30
नवी मार्गदर्शक तत्त्वे; घ्यावी लागेल परवानगी
बीड : जिल्ह्यामधील हजारो उसतोडणी महिला कामगारांची गर्भाशये काढल्याचे उघडकीस आल्याने खडबडून जाग आलेल्या सरकारने गर्भाशय शस्त्रक्रियेसंदर्भात १७ मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. त्यानुसार ३५ वर्षांखालील महिलेली गर्भाशय शस्त्रक्रिया झाल्यास त्याचे मेडिकल आॅडिट केले जाईल आणि दर महिन्याला अशा शस्त्रक्रियांचा अहवाल शल्यचिकित्सकांना सादर करावा लागेल. याची राज्यभरात अंमलबजावणी होणार आहेत.
अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांनी याबाबत मार्गदर्शक तयार करून पाठवली आहेत. बीड जिल्ह्यात महिलांची गर्भाशये काढण्याचा प्रकार समोर येताच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोºहे यांच्या समितीने चौकशी केली होती. आता कडक पाऊले उचलत ३५ वर्षांच्या आत शस्त्रक्रिया केल्यास मेडिकल आॅडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे प्रत्येक खासगी रुग्णालयाला गर्भाशये काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. ती माहिती दर महिन्याला जिल्हाशल्य चिकित्सकांकडे सादर करावी लागेल. यापुढे ऊसतोडणी महिलांची जाण्यापूर्वी व परतल्यानंतर आरोग्य तपासणी करण्यात येणार येईल आणि आरोग्य तपासणीचे स्वतंत्र रजिस्टर ठेवले जाईल.