दहावीचा निकाल लागला, पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला येणार गती;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:01+5:302021-07-20T04:23:01+5:30

बीड : दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्याने आता पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला गती येणार असून आतापर्यंत नोंदणी झालेल्या ३०३ पैकी ९५ जणांचे ...

The result of the tenth, the speed of admission to the Polytechnic; | दहावीचा निकाल लागला, पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला येणार गती;

दहावीचा निकाल लागला, पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला येणार गती;

googlenewsNext

बीड : दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्याने आता पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला गती येणार असून आतापर्यंत नोंदणी झालेल्या ३०३ पैकी ९५ जणांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. गतवर्षी ९५९ जागा जिल्ह्यात रिक्त होत्या. महाराष्ट्रात तंत्रशिक्षण संचालनालयाकडून पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया ३० जून ते २३ जुलैदरम्यान सुरू असून प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी होत आहे.

दहावीनंतर करिअरविषयक प्रश्नावर अत्यल्प खर्चामध्ये दर्जेदार शिक्षण व योग्य रोजगाराची हमी यामुळे पॉलिटेक्निक प्रवेशाकडे कल वाढत आहे. बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासंबंधी सखोल मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येते. तसेच योग्य शाखा निवड करण्यासाठी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले जाते. संगणकाद्वारे नोंदणी व प्रवेशाची व्यवस्था महाविद्यालयामार्फत मोफत केलेली आहे. नोंदणीसाठी लागणारी दहावीची गुणपत्रिका, दाखला किंवा इतर कागदपत्रे सध्या नसतील, तरी मोफत नोंदणी २३ जुलैपर्यंत करून दिली जाईल. विद्यार्थ्यांनी या विविध सुविधांचा लाभ घेऊन आपल्या तांत्रिक शिक्षणाचा प्रवेश लगेच निश्चित करावा, असे आवाहन प्रवेश समितीच्या समन्वयक डॉ. प्रा. ए. बी. बहिर यांनी केले आहे.

-----

जिल्ह्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालये १०

शासकीय - १, खासगी ९

-

एकूण प्रवेश क्षमता - २४६०

आतापर्यंत अर्ज नोंदणी - ३०३

प्रवेश निश्चित - ९५

अर्ज भरण्याची अखेरची मुदत - २३ जुलै

विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांकच नाही -

यावर्षी दहावीच्या परीक्षा व त्याचे निकाल याविषयी बराच काळ संभ्रमावस्था होती. परीक्षा होतील की नाही यावरच खल झाला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्या. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा आसन क्रमांक माहीत नव्हते. विद्यार्थ्यांच्या प्रमुख अडचणींमध्ये निकालाविषयी संभ्रमावस्था होती. मात्र त्यांचा निकाल लागल्यामुळे ती संपली आहे.

दहावीचा निकाल लागल्याने येणार गती

दहावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे संभ्रम दूर झाले असून मूल्यांकनाच्या परीक्षेत प्राप्त गुणांचा अंदाज घेत पुढचे सुलभ शिक्षण म्हणून पॉलिटेक्निक शिक्षणाकडे वळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मिळालेल्या गुणांची खात्री होताच व हाती गुणपत्रक पडताच पॉलिटेक्निक प्रवेशासाठी गती येणार आहे.

गेल्यावर्षी ४० टक्के जागा रिक्त

गतवर्षी ऑनलाईन अर्जाची मुदत दोन महिने वाढवूनही ९५९ जागा जिल्ह्यात रिक्त राहिल्या होत्या. बीड जिल्ह्यासाठी २०२०-२१ साठी पॉलिटेक्निकच्या २४६० जागा मंजूर होत्या. यापैैकी १५०१ जागा भरण्यात आल्या.

-------------

विद्यार्थ्यांच्या अडचणी काय?

मी दहावीची परीक्षा दिली. मला ९० टक्के गुण मिळाले आहेत. पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यायचा आहे. परंतु उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. त्यासाठी तहसील कार्यालयात जाऊन माहिती घेतली व सेतू केंद्रात अर्ज दिले आहेत.

- स्वप्निल कुलकर्णी, विद्यार्थी, बीड.

-- ----

चालू आर्थिक वर्षाचे नॉनक्रिमिलेयर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, शाळेचा दाखला. आठवी, नववी, दहावीचे गुणपत्रक वेळेत मिळणे आवश्यक आहे. शाळा आणि तहसील कार्यालयात पालक संपर्क करून पाठपुरावा करत आहेत. योग्य रोजगाराची हमी असल्याने प्रवेश घेण्याचा विचार आहे.

- वेदांत राडीकर, बीड.

-----

बीड जिल्ह्यामध्ये एक शासकीय व नऊ खासगी अशी दहा तंत्रनिकेतने आहेत. मागील वर्षी २४६० पैकी १५०१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यावर्षीही स्कूल कनेक्टअंतर्गत मुख्याध्यापकांसोबत बैठक, प्रत्यक्ष संपर्काद्वारे प्रवेश वाढविण्यासाठी जनजागृती सुरू आहे.

- डॉ. मो. रा. लोहकरे, प्राचार्य. नोडल अधिकारी, बीड जिल्हा.

-------------

Web Title: The result of the tenth, the speed of admission to the Polytechnic;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.