किरकोळ किराणा दुकाने बंद, मात्र होलसेल दुकाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:38+5:302021-07-30T04:34:38+5:30
केज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी झालेल्या कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन ...
केज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी झालेल्या कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन केज शहरातील व्यावसायिकांची दुकाने बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. मात्र शहरातील काही ठोक किराणा दुकाने व स्वीट होमला सूट दिली की काय ? असा प्रश्न सामान्य नागरिक, व्यावसायिक विचारत आहेत. सायंकाळी चार वाजेनंतर ही दुकाने सताड उघडी असल्याचे चित्र शहरातील मुख्य रस्त्यावर दिसून येत असल्याने प्रशासनाच्या दुटप्पीपणा बद्दल संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची कमी झालेली रुग्ण संख्या परत वाढू लागल्याने महसूल व पोलीस प्रशासन ,नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील किरकोळ व्यावसायिकांची दुकाने चार वाजताच बंद केली जातात. अनावधानाने एखादे दुकान बंद करण्यास विलंब झाला तर त्या किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र केज शहरातील किरकोळ व्यावसायिकांची दुकाने बंद करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वीट होम चालक व ठोक किराणा व्यापाऱ्यांना अभय असल्याचे चित्र दिसून येत आहे. सताड उघडी असणाऱ्या दुकानात खरेदीसाठी आलेले नागरिक तसेच दुकानदारांकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने बंद करून ठोक व्यापाऱ्यांना मात्र दुकाने चालू ठेवण्यास केज शहरातील प्रशासनाने परवानगी दिली काय असा संतप्त सवाल किरकोळ व्यावसायिकांतून केला जात आहे.
---------
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केज शहरात सायंकाळी चार वाजल्यानंतर कोणासही दुकाने चालू ठेवण्याची परवानगी नाही. सायंकाळी चार वाजेनंतर जी दुकाने, अस्थापना चालू असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
-- सचिन देशपांडे, प्रभारी मुख्याधिकारी, केज.
ओळखीचा फायदा
केज शहरातील ठोक व्यापारी हे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन आपली दुकाने चालू ठेवतात. तर किरकोळ विक्री करणारे व्यापारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे नसल्याने त्यांची दुकाने मात्र चार वाजताच बंद केली जातात. केज शहरातील स्वीट होमचे एक शटर लावून आत गर्दी करून व्यवसाय केला जात आहे. याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी किरकोळ व्यापारी प्रवीण देशपांडे यांनी केली आहे.