मुलावरील संकट टाळण्याची बतावणी देऊन सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस दोन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 04:32 PM2019-01-17T16:32:41+5:302019-01-17T16:55:17+5:30

दोन भामट्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस फसवित तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला.

retired headmaster's two lakhs looted by giving fake promise of a avoid child crisis | मुलावरील संकट टाळण्याची बतावणी देऊन सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस दोन लाखांचा गंडा

मुलावरील संकट टाळण्याची बतावणी देऊन सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस दोन लाखांचा गंडा

Next

बीड : 'तुमच्या मुलावर मोठे संकट येणार आहे हे संकट कमी करायचे असेल तर तुमच्या अंगावरील सर्व दागिने काढून पर्समध्ये ठेवा. ती पर्स आमच्याकडे द्या अन दहा पावले कुलदेवतेचा जप करत  जाऊन परत या  मुलाची सगळी संकटे टळतील' अशी बतावणी करून दोन भामट्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस फसवित तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एसबीआय बँकेच्या समोर घडली. 

सुशीला पुरुषोत्तम कुलकर्णी (६९, रा. तिरुपती कॉलनी, बीड) असे सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचे नाव आहे. बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी त्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शिवाजीनगर शाखेमध्ये गेल्या होत्या. तेथील काम झाल्यानंतर बँकेच्या प्रवेशद्वारातून त्या बाहेर पडल्या. याच दरम्यान एक अनोळखी व्यक्ती तिथे आला.'मी हरिद्वारचा आहे' अशी ओळख करून देत त्याने कुलकर्णी यांना एका महिलेचा पत्ता विचारला. तेव्हा त्यांनी मला पत्ता माहिती नसल्याचे सांगितले.

ते दोघे बोलत असतानाच आणखी एक अनोळखी व्यक्ती तिथे आला. 'मला माझ्या घरात सुनेपासून त्रास आहे, त्यासाठी काहीतरी उपाय सांगा' असे तो म्हणाला. तेव्हा पहिल्या अनोळखी व्यक्तीने दुसऱ्यास तुझ्याकडील सर्व सोन्याच्या वस्तू कुलकर्णी यांच्याकडे दे व दहा पाऊले मारुतीचा जप करत पुढे जा, असे सांगितले. त्यानुसार त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याच्याकडील वस्तू काढून देत तो दहा पावले पुढे जाऊन परत आला.

अगदी याच पद्धतीने पहिल्या भामट्याने सुशीला कुलकर्णी यांनाही अशीच बतावणी केली. 'तुम्हाला तीन मुले आहेत. तुमच्या लहान मुलावर मोठे संकट येणार आहे. हे संकट मी कमी करतो व मुलाला सुखी करतो. त्यासाठी तुमच्याकडील सर्व दागिने तुमच्या पर्समध्ये ठेवा व ती पर्स माझ्या सहकाऱ्याकडे द्या आणि कुलदेवतेचा जप करत दहा पावले पुढे जाऊन परत या' असे सांगितले. त्या दोन्ही भामट्यावर विश्वास ठेवत सुशीला कुलकर्णी यांनी आपल्याकडील २२ हजाराची रक्कम, १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे दागिने, घरून सोबत आणलेली रक्कम असा एकूण २ लाख २ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल दोन भामट्यांच्या स्वाधीन केला आणि कुलदेवतेचा जप करत त्या पुढे गेल्या. 

मात्र, त्या परत येईपर्यंत दोन्ही भामटे तेथून पसार झाले होते. हे पाहून कुलकर्णी यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून सर्व कैफीयत पोलिसांसमोर मांडली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. 

नागरिक अद्यापही अनभिज्ञच
पोलिसांकडून सायबर क्राईम आणि हातचालाकी करणाऱ्या, अनोळखी व्यक्तींपासून सावधान राहण्याबाबत जनजागृती करण्यासह माहिती देत आहेत. मात्र आजही अनेकजण याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये सुशिक्षित लोकही अडकत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. नागरिकांना जनजागृतीपासून वंचित राहणेच त्यांच्या अंगलट येत आहे.

पहा व्हिडिओ :

Web Title: retired headmaster's two lakhs looted by giving fake promise of a avoid child crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.