गुंगीचे औषध खायला देऊन सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:36+5:302021-07-30T04:34:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केज : तालुक्यातील टाकळी येथील सेवानिवृत्त शिक्षकास गुंगीचे औषध खाण्यास देत त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील टाकळी येथील सेवानिवृत्त शिक्षकास गुंगीचे औषध खाण्यास देत त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या व नगदी ४२ हजार रुपयांचा ऐवजावर सराईत ठकसेनाने डल्ला मारला. हा प्रकार २० जुलैरोजी केज शहरातील उमरी रस्त्यावर घडला. या प्रकरणी केज पोलिसात २७ जुलैरोजी सेवानिवृत्त शिक्षकाच्या तक्रारीवरून ठकसेनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील टाकळी येथील सेवानिवृत्त शिक्षक त्रिंबक दादाराव घुले (वय ६९) हे २० जुलैरोजी दुपारी एक ते साडेतीन वाजण्याच्यादरम्यान केज येथील वसुंधरा बँकेसमोर असताना आरणगाव येथील बंडू ऊर्फ माणिक सिरसट याने त्यांना उमरी रोडने घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर त्याने त्रिंबक घुले यांना गुंगीचे औषध खायला दिले. घुले यांना गुंगी येताच सिरसट याने त्यांच्या हातातील प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या आणि खिशातील नगदी २ हजार रुपये असा एकूण ४२ हजार रुपयांचा ऐवज काढून घेऊन पसार झाला. याप्रकरणी त्रिंबक घुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, माणिक सिरसट याने याप्रकारे अनेक वृद्ध नागरिकांची फसवणूक करून त्यांना गुंगीचे औषध देऊन चोऱ्या केलेल्या असल्याने त्याच्याविरुद्ध केज पोलिसात यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.