परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:20 PM2019-11-07T16:20:46+5:302019-11-07T16:21:45+5:30

९६० हेक्टरवरील पिकांचे परतीच्या पावसाने केले वाटोळे

return rains destroys the rain, now the problem of double sowing | परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट 

परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट 

Next

- नितीन कांबळे 

कडा (जि. बीड) : परतीच्या पावसाने आम्हाला उद्ध्वस्त केलंय. समदा पावसाळा गेला, पण शेतीला पाहिजे तसा पाऊस नाही झाला आणि पुन्हा परतीचा पाऊस सुरू झाला.  उसनवारी करून शेतीत गाडलेले बी उगवून वर येताच या पावसाने सगळे उद्ध्वस्त केले.  

परतीच्या पावसाने आमची रान उपाळली,  आता दुबार पेरणीचे संकट आमच्या नशिबी आल्याची कैफियत आनंदवाडी सराटेवडगाव येथील शेतकरी उत्तम कापरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, सराटेवडगाव येथे प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.     

आष्टी तालुक्यात  शेतात मोठ्या मेहनतीने कांदा, ज्वारी, हरभरा, मठ , कपाशी, तुरीची लागवड केली होती. पण   परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जेव्हा पावसाची खरी गरज होती तेव्हा पाण्याविना पिके कोमात गेली आणि आता पाण्यामुळे पिके धोक्यात आली, अशी अवस्था  आहे. आनंदवाडी येथील ४३१ हेक्टर  व  सराटेवडगाव येथील ५३०  हेक्टर क्षेत्र अशा एकूण ९६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे अमोल सुंबरे, राजाराम ननवरे यांनी सांगितले. तर परतीचा पाऊस चांगला झाला आणि रान उपळून मनस्ताप झाल्याचे येथील शेतकरी रामदास तरटे म्हणाले. 

शासनाने तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. कारण दुबार पेरणीसोबतच आर्थिक संकटदेखील ओढावल्याचे येथील सरपंच प्रा.राम बोडखे यांनी सांगितले. ४० हजार हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.  कांदा, सोयाबीन, कापूस, बाजरी या पिकांची माती झाली आहे. पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्राथमिक नुकसान झालेल्या चाळीस हजार हेक्टर क्षेत्राचा अहवाल सादर केल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले. 

Web Title: return rains destroys the rain, now the problem of double sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.