परतीच्या पावसाने दिला दिलासा; मृतसाठ्यातील माजलगाव धरण ९५ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 07:43 PM2019-11-12T19:43:39+5:302019-11-12T19:46:11+5:30
माजलगाव धरण १०० टक्के भरण्यासाठी ९ इंच पाणी पातळीची आवश्यकता
माजलगाव : परतीच्या पावसाने मृत साठ्याबाहेर आलेले माजलगाव धरण मंगळवारी 95.50 टक्के भरले असून शहरासह बीड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीचा सिंचनाचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
मागील महीन्या पासून धरण क्षेत्रात झालेल्या बेमोसमी पाऊसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त राहिल्याने मंगळवारी दुपारी धरणाच्या पाणी पातळीने पंचानवी पार केली आहे. मागील दहा पंधरा वर्षात अनेक वेळा माजलगाव धरण परतीच्या पावसावर भरले होते. यावर्षी हे धरण सप्टेंबर मध्ये जोत्याखाली २५ टक्के गेले होते. पावसाळा संपत आल्याने व पाण्याची पातळी अत्यंत खालावलेली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते परंतु मागील महीन्या पासून धरण क्षेत्रात बेमोसमी पाऊस झाल्याने धरणाची पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मंगळवारी दुपारी धरणातील पाणी पातळी 95 टक्क्याला पार करून गेली आहे. आता हे धरण भरायला केवळ 18 सेमी एवढी पाणी पातळी वाढण्याची आवश्यकता आहे.
या धरणाची पाणी पातळी मंगळवारी दुपारी चार वाजता 431.62 मीटर ऐवढी झाली आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मीटर पा्ण्याची आवश्यकता असते. धरणात आज रोजी 296 दलघमी उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे तर आवक 1412 क्युसेस ऐवढी असून पाणी साठा 438 दलघमी एवढा झाल्याची माहिती धरणाचे शाखाअभियंता बी.आर. शेख यांनी दिली.