मृतदेह घेऊन परतताना कार उलटून दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:16 PM2018-01-31T23:16:35+5:302018-01-31T23:16:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी व कोकणात कणकवली येथे विद्युत वितरणमध्ये नोकरीस असलेल्या कृष्णा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी व कोकणात कणकवली येथे विद्युत वितरणमध्ये नोकरीस असलेल्या कृष्णा मस्के यांचा शॉक लागुन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. त्यांचा मृतदेह घेऊन गावी परतत असताना कार उलटली. यामध्ये दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री मादळमोही येथे घडली. दरम्यान, एकाच कुटूंबातील दोन व्यक्ती ठार झाल्याने मस्के कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कृष्णा मस्के हे मुळचे रेवकी येथील रहिवासी असून सध्या गेवराई शहरातील शिवाजीनगर भागात वास्वव्यास आहेत. अनेक वर्षांपासून ते कणकवली येथे महावितरणमध्ये लाईनमन या पदावर कार्यरत होते. कणकवल येथे विद्युत वितरण विभागात लाईनमन म्हणून कार्यरत होते. मंगळवारी दुपारी विद्युत पोलवर चढून काम करीत असताना त्यांना शॉक लागला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नातेवाईकांना समजताच त्यांनी कणकवलीकडे धाव घेतली. कृष्णा मस्के यांचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला आणि बाकीचे लोक एका कारमधून (एमएच २३ ई ७४०४) रेवकीकडे येत होते. गेवराई तालुक्यातील मादळमोहीजवळ अचानक कार उलटली. यामध्ये चालक विशाल अशोक घोडे (२५ रा.राजपिंपरी) व वैभव बंडू मस्के (१४) हे दोघे जागीच ठार झाले. वैभव हा नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तर गाडीत बसलेले बंडू मसू मस्के व त्यांची पत्नी ज्योती मस्के हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातात कार चक्काचूर झाली.