अंबाजोगाईत गर्दी रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासन रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:48+5:302021-04-16T04:33:48+5:30
अंबाजोगाई - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अंबाजोगाई शहरात महसूल व पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना कारवाईचा ...
अंबाजोगाई - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अंबाजोगाई शहरात महसूल व पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना कारवाईचा बडगा दाखवत आहेत. तर अँटीजेन टेस्ट झालेल्या फळ विक्रेत्यांना फळ विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे, असे आवाहन नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. येत्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या रुग्णांनी १४ दिवसात दोन हजारांचा आकडा पार केला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाने कितीही कठोर निर्बंध घातले तरी नागरिकांची बेफिकिरी सुरूच आहे. अंबाजोगाई शहरात गुरुवारी सकाळी वाढती गर्दी रोखण्यासाठी व शहरात शिस्त निर्माण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगर अभियंता विश्वनाथ लहाने, यांच्यासह पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार व महसूलचे कर्मचारी रस्त्यावर उतरून नागरिकांना कारवाईचा बडगा दाखवत आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची मोठी संख्या अंबाजोगाईत आढळून येत आहे. पोलीस खाक्या दाखविल्यानंतर आगामी काळात गर्दीवर नियंत्रण येणार आहे.
अंबाजोगाई शहरातील संसर्ग रोखण्यासाठी ज्या फळ विक्रेत्यांना फळ विक्रीसाठी परवानगी दिली आहे. त्या फळविक्रेत्यांनी दोन दिवसात आपल्या अँटीजेन टेस्ट करून घ्याव्यात जे फळविक्रेते स्वत:ची टेस्ट करून घेणार नाहीत. त्यांना फळ विक्रीसाठी परवानगी मिळणार नाही, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले आहे.
घरातच रहा, कोरोनाचे नियम पाळा
महाराष्ट्रात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तर रात्री संचारबंदी लागू आहे. यासाठी नागरिकांनी घरात राहण्याला पसंती द्यावी. रुग्णालयाचे अथवा महत्त्वाचे काम असले तरच घराबाहेर पडा. अन्यथा बाहेर फिरणे टाळा, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, सतत हात धुणे व सामाजिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचा अवलंब करा व स्वत:ची काळजी घ्या. असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी केले आहे.
===Photopath===
150421\avinash mudegaonkar_img-20210415-wa0048_14.jpg
===Caption===
अंबाजोगाईत गर्दी रोखण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरले.