महसूल, पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:16+5:302021-07-29T04:33:16+5:30
कडा : महसूल, पोलीस प्रशासन आणि वाळू माफिया यांच्यात आर्थिक तडजोड होत असल्याने अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी यांना वाळू ...
कडा : महसूल, पोलीस प्रशासन आणि वाळू माफिया यांच्यात आर्थिक तडजोड होत असल्याने अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी यांना वाळू उपसा होत असल्याची माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तालुक्यातील सिना नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी खड्डे केल्याने वाटोळे झाल्याचा प्रकार घोंगडेवाडी परिसरात दिसून येत आहे.
एवढेच नव्हे तर माळावर मोठ्या प्रमाणावर अवैध साठादेखील केला असल्याने या माफियांना अभय कोणाचे हे समजत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यात दररोज रात्री अपरात्री जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा करून टॅक्टर माध्यमातून त्याची वाहतूक व साठा केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखा, महसुल, पोलीस यांनी मध्यंतरी कारवाया केल्या; पण त्या तेवढ्यापुरत्या मर्यादित राहिल्या. आजमितीला तालुक्यातील मांडवा गावासह इतर अन्य गावांत देखील वाळूची खुलेआम वाहतूक व उपसा केला जात आहे. सिना नदीपात्रातून कारवाया होऊनही खुलेआम वाळू उपसा केला जातोय. हा वाळू उपसा थांबावा यासाठी महसूल, पोलीस, प्रशासनातील अधिकारी यांना भेटून, फोन करून याची माहिती देऊनदेखील कसलीच कारवाई होताना दिसत नाही. सिना नदीपात्रातून होत असलेल्या वाळू उपसाचा मोठा साठा घोंगडेवाडी परिसरात दिसत आहे. स्थानिक तहसीलदार यांना बोलून कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आष्टी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
280721\nitin kmble_img-20210727-wa0090_14.jpg