आष्टी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:20+5:302021-07-09T04:22:20+5:30
आष्टी : कोरोना विषाणूने बाधित रुग्णांच्या आकडेवारीमध्ये घट झाली होती. परंतु मागील आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वाधिक आष्टी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची ...
आष्टी : कोरोना विषाणूने बाधित रुग्णांच्या आकडेवारीमध्ये घट झाली होती. परंतु मागील आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वाधिक आष्टी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आष्टी गाठून ८ जुलै रोजी आष्टी पंचायत समिती सभागृहात विविध विभागांचे अधिकारी व ग्रामसेवक, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
कोरोनाकाळात आरोग्य विभागाचे अधिकारी, सरपंच व ग्राम सुरक्षा समितीने हलगर्जीपणा न करता काम करावे, अशा सक्त सूचना अजित कुंभार यांनी दिल्या. या वेळी कोविड सेंटरची पाहणी त्यांनी केली. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी. पवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, नायब तहसीलदार शारदा दळवी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, तालुका आरोग्य अधिकारी नितीन मोरे, गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव, विस्तार अधिकारी गोकुळ बागलाणे, नागनाथ शिंदे, ग्रामसेवक, आरोग्य विभाग अधिकारी उपस्थित होते.
या वेळी कुंभार म्हणाले की, कोरोना विषाणूचे रुग्ण तालुक्यात वाढत असून या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा समितीने काळजीपूर्वक काम करावे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास होम आयसोलेशन न राहता बाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. प्रत्येक गावात दक्षता समिती नेमावी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, दक्षता समिती सदस्यांची व्हीसीद्वारे मीटिंग घेऊन तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यावा, कंटेनमेंट झोनची परिस्थिती पाहून अंमलबजावणी करावी, अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नागरिकांनी लग्न समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करत असताना प्रशासनाच्या नियमांचे पालन करत रीतसर परवानगी घेऊन आयोजन करावे, मास्क वापरावे, विनाकारण फिरू नये, कोरोनामुक्तीसाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे सांगितले.
...तर सरपंच, उपसरपंचांचे पद धोक्यात
आष्टी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांना यापुढे होम क्वारंटाइन न राहता संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे आहे. कोरोनाबाधित रुग्ण गावात आढळल्यास रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. सरपंच, उपसरपंच यांचेसुद्धा पद धोक्यात येणार आहे. बाधित रुग्ण आढळून आल्यास कलम ३९ अ नुसार सरपंचाचे पद धोक्यात येणार असल्याच्या सक्त सूचना नायब तहसीलदार शारदा दळवी व गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दिल्या आहेत.
080721\img-20210708-wa0365_14.jpg