बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:36+5:302021-04-24T04:34:36+5:30
बीड : राज्यात खते, बी-बियाणे, औषधींचा बोगस पुरवठा करणारे फार मोठे रॅकेट आहे. बोगस बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची ...
बीड : राज्यात खते, बी-बियाणे, औषधींचा बोगस पुरवठा करणारे फार मोठे रॅकेट आहे. बोगस बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे परवाने नूतनीकरण कृषी खात्याने थांबवावे, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी वसंत मुंडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत राज्याच्या कृषी खात्याकडे त्यांनी निवेदन पाठविले आहे. २०१८ पासून महाराष्ट्रात बोगस खते, बी-बियाणे, औषधी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची साखळी कार्यरत आहे. याबाबत अनेक तक्रारी शासनाकडे दाखल झालेल्या आहेत. यासंदर्भात विविध समित्या चौकशीसाठी नेमलेल्या आहेत. परंतु कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. या कंपन्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप देखील मुंडे यांनी केला आहे.
परराज्यातील उत्पादक व विपणन कंपन्यांना महाराष्ट्रात विक्री करण्याचे परवाने कसे काय दिले जातात? बियाणे कायदा, अधिनियमाचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. दुबार पेरणीसारखे संकट शेतकऱ्यांवर येते. त्यामुळे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. त्यामुळे सरकारने अशा कंपन्यांचे तातडीने परवाने रद्द करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.