रुसलेले कुंकू हसले अन् चिमुकल्याला पितृछत्र मिळाले; विधवा भावजयीशी दिराचा विवाह
By संजय तिपाले | Published: February 23, 2023 11:49 AM2023-02-23T11:49:28+5:302023-02-23T11:50:44+5:30
बीडमध्ये तरुणाचे परिवर्तनवादी पाऊल; नियतीच्या खेळाने तिचे आयुष्य सैरभैर झाले. मात्र, सुशिक्षित दिराने आपल्या विधवा भावजयीला आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला.
बीड : ते दोघेही सुशिक्षित. लग्नानंतर गुलाबी दिवस सुरू झाले. स्वप्नांच्या दुनियेत रमलेल्या या जोडप्यांनी वर्षभरातच गुड न्यूज दिली. मात्र, या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि पतीची साथ कायमची सुटली. पती निधनानंतर दुसऱ्याच दिवशी पुत्ररत्न जन्माला आले. एका डोळ्यात आसू अन् दुसऱ्यात हसू... अशा नियतीच्या खेळाने तिचे आयुष्य सैरभैर झाले. मात्र, सुशिक्षित दिराने आपल्या विधवा भावजयीला आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिचे रुसलेले कुंकू हसले, तर चिमुकल्याला पितृछत्र मिळाले. २१ फेब्रुवारीला बीडमध्ये नोंदणी पध्दतीने हा विवाह झाला.
पतीचे निधन झाले आणि दुसऱ्याचदिवशी शिवाणी पाटणकर हिने गोंडस मुलाला जन्म दिला. चिमुकल्याचा सांभाळ आणि वैधव्याचे आयुष्य तिच्या नशिबी आले. मात्र, दीर प्रमोद पाटणकर याने चिमुकल्यासह शिवाणीला आयुष्यभरासाठी पदरात घेतले. या दोघांचा बुधवारी २१ फेब्रुवारीला नोंदणी पद्धतीने विवाह झाला. शहरातील आयोध्यानगर भागातील शंकर पाटणकर यांचा विवाह आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टत्त येथील शिवाणीसोबत २०१९ मध्ये झाला. शंकर हे खासगी कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करत. सारे काही सुरळीत सुरू होते. संसारवेलीवर फूल उमलणार असल्याच्या बातमीने दोघेही आनंदात होते. मात्र, वर्षभरापूर्वी शंकर पाटणकर हे काम करत असताना उंचावरून पडले. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान वेदना असह्य होत होत्या. त्यामुळे मनाने खचलेल्या शंकर यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. गर्भवती पत्नी शिवाणीचे नऊ महिने सरत आले होते. पती निधनानंतर दुसऱ्याच दिवशी तिला प्रसव वेदना झाल्या व तिने गोंडस मुलाला जन्म दिला.
ऐन तारुण्यात पती वियोगाचे दु:ख व पदरात गोंडस मूल असे दु:ख व सुखाचे हेलकावे खात शिवाणी अश्रू ढाळत होती. येथील महिला व बालकल्याण विभागातील परिविक्षा अधिकारी सुदाम निर्मळ यांचा पाटणकर कुटुंबाशी स्नेह आहे. शंकर यांचा धाकटा भाऊ प्रमोद हा पदवीधर झालेला आहे. सुदाम निर्मळ व सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक असलेल्या त्यांच्या पत्नी सोनाली यांनी त्याच्यापुढे विधवा भावजयीशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. तो लगेचच राजी झाला. मग, निर्मळ यांनी नातेवाईकांचे समुपदेशन केले. माहेर व सासरच्या मंडळींनीही भविष्याचा विचार करून होकार दिला. त्यानंतर २१ फेब्रुवारीला मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीती नोंदणी पध्दतीने हा विवाह झाला.
परंपरेला फाटा देत नवी पायवाट
प्रमोद हे बालकल्याण विभागात बाह्य कंपनीमार्फत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत. सध्या ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर शिवाणी या शहरातील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षिका आहेत. दोघांनीही परंपरेला फाटा देत कृतीतून नवी पायवाट तर निवडलीच, पण परिवर्तनवादी संदेश दिला. त्यामुळे या विवाहाचे स्वागत होत आहे.