लय भारी शोध... वाहन चालवताना झोपणाऱ्या चालकाला जागे करणारा ‘चष्मा’!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:06 PM2022-03-07T19:06:38+5:302022-03-07T19:07:31+5:30
विज्ञान दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले.
अविनाश मुडेगावकर/
अंबाजोगाई : वैज्ञानिक जाणीव विकसित करीत नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्यात आता शालेय विद्यार्थीही पुढाकार घेत आहेत. येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या प्रणव सूर्यवंशी याने डुलकी लागणाऱ्या चालकास जागे करणारा चष्मा तयार केला आहे. अपघात टाळण्यासाठी बनविण्यात आलेल्या चष्म्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले. त्यात बाल वैज्ञानिक प्रणव सूर्यवंशी याने तयार केलेल्या झोपणाऱ्या चालकास जागे करणारा चष्मा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रमुख पाहुणे प्रा. माणिकराव लोमटे, किरण कोदरकर, प्रा. डॉ. रुद्देवाड, मुख्याध्यापक एस. के. निर्मळे यांनीही बाल वैज्ञानिक प्रणव सूर्यवंशीचे कौतुक केले. या प्रदर्शनात अनेक विविध उपकरणे सादर करण्यात आली होती. परंतु प्रणवने बनविलेला चष्मा सर्वांचे आकर्षण ठरला.
कानाजवळ लावलाय सेन्सर
एका काचेच्या चष्म्याला वायर लावून कानाजवळ सेन्सर लावण्यात आले आहे. तो चष्मा घालून चालक वाहन चालवत असेल आणि त्याला झोप लागून पापण्या मिटताच कानाजवळ सेंसर कर्र आवाज करतो. त्यामुळे झोपणारा चालक जागा होतो आणि संभाव्य अपघात टाळला जातो, असे प्रणवने सांगितले. बाल वैज्ञानिक प्रशांत धायगुडे आणि चिन्मय महाजन यांनी चार लिंबापासून विद्युत निर्मिती केली असून, त्यावर छोटा बल्ब लावला. यावेळी अनेक बाल वैज्ञानिकांनी विविध प्रयोग मांडले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
झोपणाऱ्या चालकास जागे करणारा चष्मा
अपघात टाळण्यासाठी प्रणव ने तयार केला चस्मा