गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून रिक्षाचालकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:02+5:302021-07-10T04:24:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जागेच्या जुन्या भांडणाचा राग व गाडीला धक्का लागल्याचे कारण काढून एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जागेच्या जुन्या भांडणाचा राग व गाडीला धक्का लागल्याचे कारण काढून एका रिक्षा चालकास दगड, विटाने मारून गंभीर जखमी केले होते. ही घटना ६ जुलै रोजी शहरातील पेठबीड भागातील शिवनेरी नगर परिसरात घडली होती. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना या जखमी चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध ९ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
फुलचंद थिमा कुऱ्हाडे (वय ४२) असे मारहाणीत मृत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत इमामपूररोड परिसरातील शिवनेरी नगर भागात राहत होते. ६ जुलै रोजी ते रिक्षा घेऊन आपल्या घरी जात असताना दुचाकीला धक्का लागल्याने त्यांचा काही जणांसोबत वाद झाला. यावेळी सहा जणांनी मिळून फुलचंद यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, फुलचंद यांची प्रकृती चिंताजनक असल्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते.
यावेळी पेठ बीड पोलीस ठाण्यात या घटनेची सर्व माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस कान्स्टेबल अमोल दरेकर यांनी घाटी रुग्णालयात जाऊन मयत फुलचंद कुऱ्हाडे यांचा जबाब नोंदवला होता. दरम्यान, उपचारादरम्यान मारहाणीत गंभीर जखमी असल्याने फुलचंद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस निरीक्षक मंगशे पाटील, पोलीस उपनिरीक्षक गालीफखॉन पठाण, दासरवाड, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस हेडकाँस्टेबल सौंदरमल, पोलीस नाईक सुनील अलगट, अमोल दरेकर यांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला.
मयताची पत्नी लक्ष्मीबाई फुलचंद कुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर बुधाप्पा देवकर, शिवलाल राजेंद्र सोमवशे, दिनेश राजेंद्र सोमवशे, फुलाबाई राजेंद्र सोमवशे, अनिल बुधाप्पा देवकर (सर्व रा. शिवनेरीनगर, इमामपूररोड, बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगशे पाटील हे करीत आहेत.
...
एक आरोपी अटकेत
या प्रकरणातील शिवलाल राजेंद्र सोमवशे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. इतर चार आरोपी फरार असून, पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. त्यांनादेखील लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....