गेवराई तालुक्यात पाण्यासाठी दाही दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:23 AM2018-11-21T00:23:15+5:302018-11-21T00:23:41+5:30
तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.
विष्णू गायकवाड।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.
यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा निम्मेच झाले. त्यामुळे पिकांबरोबर पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात पाण्याच्या टँकर्सचा भाव ५०० रुपयांवर गेला आहे तर ग्रामीण भागात वाडी, तांङयावर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे. यावर्षी खरीप हंगामाची सुगी नावापुरतीच झाली असून ऐन पावसाळ्यात शिवार उघड झाला आहे.
तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात उसतोडीसाठी स्थलांतर करीत आहेत. मुले कडेवर, मजूर फडावर, असे चित्र असून मजुरांची संख्या शासन दरबारी ५० हजार झाली आहे. मात्र हजारो मजूर कामाच्या शोधात मुंबई, पुणे, हैदराबाद , औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर व कारखाना परिसरात स्थलांतरीत होत आहेत.
तालुक्यात जनावरांची संख्या ५० ते ६० हजारांपेक्षा अधिक असून त्याप्रमाणात चारा उपलब्ध नाही. सर्वच समाजाचा पारंपरिक व्यवसाय पशुपालन शेती हा आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे एक ते दोन खंडी गुरेढोरे असतात. तसेच अदालीच्या बोलीने शेतकºयांची जनावरे पाळली जातात. त्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे. या गुरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि वैरणच नसल्याने चारा व पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पशु संगोपन गेवराई, शिरसदेवी, उमापूर, मादळमोही, तलवाडा, चकलंबा, पाचेगाव, गढी या गावात छावण्या उघडणे आवश्यक आहे.
टँकरसाठी ४६ गावांचा प्रस्ताव
नागरिकांना दुष्काळाचे चटके मोठया प्रमाणात जाणवू लागले आहेत. सध्या नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. अशा परिस्थितीत गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी आतापर्यंत तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत.
पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे १९ नोव्हेंबरपर्यंत ४६ गावाचे टँकर सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव आले आहेत, असे गटविकास अधिकारी के.एम. बागुल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.