भडंगवाडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:41 AM2018-10-11T00:41:52+5:302018-10-11T00:42:39+5:30
गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका वृद्ध महिलेस मारहाण करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख ऐवज लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मादळमोही : गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका वृद्ध महिलेस मारहाण करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख ऐवज लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे.
भडंगवाडीचे सरंपच ज्ञानेश्वर राधाकिशन नवले हे कुटूंबासह घराच्या छतावर झोपले होते. हीच संधी साधून चोरटे घरात शिरले. घरात चार्जिंगला लावलेला मोबाईल घेत इतर ठिकाणी उचकापाचक केली. मात्र, हाती काहीच लागले नाही. नंतर शेजारीच असलेल्या सिताबाई मुरलीधर भोजगुडे यांच्या घरात प्रवेश केला. सिताबाई या एकट्याच राहतात. मंगळवारी रात्री त्या घर बंद करून आपल्या भाचीकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या घरातील रोख दहा हजार रूपये दरोडेखोरांनी लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा राणी रोहिदास कोकरे यांच्या घराकडे वळविला. राणी या आपल्या मुलासह घरात झोपल्या होत्या. दरवाजा उघडाच असल्याने चोरटे थेट राणीच्या खोलीत पोहचले. तिच्या अंगावरील दागिने घेत असताना तिला जाग आली. ती जोरात ओरडली. ओरडण्याने सासू जानकाबाई जाग्या झाल्या. याचवेळी एका दरोडेखोराने त्यांना काठीने मारहाण केली. जास्त आरडाओरडा झाल्याने दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी जानकाबाई यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेवराई पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
दरम्यान, माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, गेवराई ठाण्याचे पो.नि. दिनेश आहेर, एलसीबीचे सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस, दरोडाचे सपोनि गजानन जाधव, पोउपनि ए.बी.गटकूळ, शरद बहिरवाळ, गणेश गुरखुदे, अशेक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
फिंगर प्रिंट अन् श्वान पथक दाखल
घटनेची माहिती मिळताच श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्सपर्टला पाचारण करण्यात आले होते.
मात्र, दरोडेखोरांचा माग काढण्यात श्वानांना अपयश आले.
तपासासाठी पथके रवाना केल्याचेही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.