अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयावर रिपाइंचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:01+5:302021-02-10T04:34:01+5:30
अंबाजोगाई : राज्य सरकारकडून गरीब व दलितांवर अन्याय केला जातो आहे. त्यांच्या अडीअडचणींचे या सरकारला देणे-घेणे नाही. गायरान ...
अंबाजोगाई : राज्य सरकारकडून गरीब व दलितांवर अन्याय केला जातो आहे. त्यांच्या अडीअडचणींचे या सरकारला देणे-घेणे नाही. गायरान जमिनी व भोगवट्यातील घरे अद्यापही नावावर केली जात नाहीत. महामंडळांना निधी न दिल्याने महामंडळे डबघाईला आली आहेत. अन्याय, अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून तात्काळ सोडवून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार असल्याचा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या घेऊन ९ रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोष मोर्चात हजारो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पप्पू कागदे यांनी म्हटले आहे की, बर्दापूर येथील महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होऊन ४ महिन्यांचा काळ लोटला आहे. त्याठिकाणी अद्यापपर्यंत शासनाने नवीन पुतळा बसवून स्मारकाचे बांधकाम सुरू केलेले नाही. त्यामुळे तात्काळ पुतळा बसवून बांधकाम सुरू करण्यात आले पाहिजे. पुतळा विटंबना प्रकरणातील सहआरोपी व सूत्रधार यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा. गायरानधारकांचे सरसकट सातबारा नावे नोंद करून सातबारा द्या, आदी मागण्या या मोर्चात पप्पू कागदे यांनी केल्या आहेत.
यावेळी राजू जोगदंड, किसन तांगडे, दशरथ सोनवणे, प्रमोद दासूद, दीपक कांबळे, अशोक साळवे, मजर खान, दीपक कांबळे, गोवर्धन वाघमारे, महादेव उजगरे, बापू पवार, नरेंद्र जावळे, सचिन कागदे, बन्सी जोगदंड, राणी गायकवाड, कपिल कागदे, मंगेश जोगदंड, राहुल गंडले, किरण खंडागळे, सनी वाघचौरे, प्रकाश तांगडे यांच्यासह कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.