मंगरूळमध्ये ४० शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:39 AM2021-09-17T04:39:51+5:302021-09-17T04:39:51+5:30
माजलगाव : तालुक्यातील मंगरूळ नं.१ येथून धरणाकडे जाणारा रस्ता गावातील एका इसमाने अडवल्याने या रस्त्यावर शेती असलेल्या ३०-४० शेतकऱ्यांची ...
माजलगाव : तालुक्यातील मंगरूळ नं.१ येथून धरणाकडे जाणारा रस्ता गावातील एका इसमाने अडवल्याने या रस्त्यावर शेती असलेल्या ३०-४० शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली आहे. महसूल विभागाने तात्काळ हा रस्ता खुला करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार बाजीराव जगताप यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
माजलगाव तालुक्यातील पुनर्वसित गाव असलेल्या मंगरूळ नं. १ येथे गावातून धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास ३०-४० शेतकऱ्यांची शेती आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून हे शेतकरी वहिवाट असलेल्या रस्त्याचा वापर करतात, या रस्त्याची शासकीय नकाशावर देखील नोंद आहे. तसेच ग्रामपंचायतीचा ठराव संमत आहे, असे असतानादेखील गावातील एका इसमाने हा रस्ता अडवून बंद करून शेतकऱ्यांची अडवणूक केली व वहिवाटीस मज्जाव केला आहे. त्यामुळे शेतीची कामे करण्यास शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांनी तात्काळ माजी आमदार बाजीराव जगताप यांच्याकडे धाव घेतली. जगताप व बंडू जैन, बलभीम बापमारे, होके यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन तहसीलदारांना दिले असून तात्काळ अडवलेला रस्ता सुरू करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा जगताप यांनी दिला.