रोडरोमिओने घेतला बळी;पाठलाग करत मुलीच्या पित्यावर रॉडने हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 01:20 PM2022-04-11T13:20:04+5:302022-04-11T13:28:35+5:30

आधी मुलीचे फोटो सोशल मीडियात केले व्हायरल, वडिलांनी जाब विचारातच दिली होती खुनाची धमकी

Road romeo chases and hits the girl's father on the bike with a rod, death during treatment | रोडरोमिओने घेतला बळी;पाठलाग करत मुलीच्या पित्यावर रॉडने हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

रोडरोमिओने घेतला बळी;पाठलाग करत मुलीच्या पित्यावर रॉडने हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

- दीपक नाईकवाडे
केज ( बीड) : मुलीसोबत लग्न लावून दे अन्यथा खून करेल, अशी धमकी देत रोडरोमिओने दुचाकीवरील मुलीच्या पित्यावर रॉडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी संत सेना महाराज मंदिराच्या जवळ घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या पित्याचा आज सकाळी उपचारादरम्यान लातूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. रमेश एकनाथ नेहरकर असे मृताचे नाव आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तांबवा येथील भागवत चाटेने केज येथील साने गुरुजी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळेत सेवक म्हणून काम करत असलेल्या रमेश एकनाथ नेहरकर यांच्या सतरा वर्षीय मुलीचे फोटो सोशल मीडियावर वायरल केले होते. याचा जाब रमेश नेहरकर याने विचारातच भागवतने तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दे अन्यथा खून करेल, अशी धमकी दिली होती. शनिवार ( दि. ९ ) कळंब येथून रमेश एकनाथ नेहरकर आपल्या दुचाकीवरून (एम एच -४४/एफ-४८३२) केजकडे येत होते. वाटेत दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेख फरीद बाबा दर्गा आणि संत सेना महाराज मंदिराच्याजवळ  भागवत चाटे आणि त्याच्या दोन साथीदारांनी नेहरकर यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरु केला. 

दरम्यान, भागवतने धावत्या दुचाकीवरील नेहरकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नेहरकर रस्त्यावर कोसळले. त्यानंतर भागवत दोन्ही साथीदारासह केजच्या दिशेने निघून गेला. जखमी नेहरकर यांना पाहून नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक अशोक नामदास यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी रमेश नेहरकर यांना रुग्णवाहिकेतून केज येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने नेहरकर यांना  अधिक उपचारासाठी लातूर येथे एका खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान आज सकाळी नेहरकर यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात रमेश नेहरकर यांची पत्नी पुष्पा नेहरकर यांच्या तक्रारीवरून शनिवारी भागवत चाटे आणि दोन अनोळखी यांच्याविरुद्ध गु. र. नं. ११४/२०२२, भा. दं. वि. ३०७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज नेहरकर यांचा मृत्यू झाल्याने आरोपी भागवत चाटे व त्याच्या दोन साथीदारांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिनही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मिसळे करीत आहेत. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली असून मुलींची आणि त्यांच्या पालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याची चर्चा होत आहे.

Web Title: Road romeo chases and hits the girl's father on the bike with a rod, death during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.