सूरनरवाडीत १७ लाखांचे रस्ता काम निकृष्ट - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:19+5:302021-08-15T04:34:19+5:30
बीड : धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथे १७ लाखांचे सिमेंट रस्ता काम करण्यात आले होते. हे काम निकृष्ट झाल्याची तक्रार ...
बीड : धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथे १७ लाखांचे सिमेंट रस्ता काम करण्यात आले होते. हे काम निकृष्ट झाल्याची तक्रार धारूरचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अशोक करे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. २३ तारखेपर्यंत यावर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिला आहे. सुरनरवाडी येथे २५१५ योजनेंतर्गत गावात चार ठिकाणी सिमेंट रस्ता करण्यात आला आहे. तीन ठिकाणी ३ लाख तर एका ठिकाणी ८ लाख रुपये खर्च करण्यात आले, परंतु हे काम करताना सोलिंग करण्यात आलेली नाही, तसेच रस्त्याचे उंची व जाडी कमी आहे. हे काम अंदाजपत्रकानुसार न करता, निकृष्ट पद्धतीने करण्यात आलेले आहे. याबाबत अशोक करे यांनी यापूर्वीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अर्ज देत उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाईचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले, परंतु अद्यापपर्यंत कसलीच कारवाई न झाल्याने करे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा तक्रार केली आहे. २३ तारखेपर्यंत प्रशासनास कारवाईसाठी मुदत दिली आहे. जर कारवाई झाली नाही, तर अनिश्चित काळासाठी उपोषण केले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
-- सुरनरवाडीत जवळपास १७ लाखांचे सिमेंट रस्ता काम निकृष्ट झालेले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई केलेली नाही. आता २३ तारखेपासून पुन्हा उपोषणास बसणार आहे. जोपर्यंत कारवाई होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही.
अशोक करे, माजी तालुकाध्यक्ष भाजपा, धारूर.