रस्त्यांची कामे अपूर्ण; बीडकरांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:10 AM2020-01-29T00:10:44+5:302020-01-29T00:11:32+5:30
बीड : शहरात विविध ठिकाणी नवीन रस्ते बनविण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी रस्ते उखडून ठेवले आहेत. सध्या हे ...
बीड : शहरात विविध ठिकाणी नवीन रस्ते बनविण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी रस्ते उखडून ठेवले आहेत. सध्या हे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चालणे मुश्किल झाले असून वाहन अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही पालिका मुग गिळून गप्प असल्याने संताप व्यक्त होत आहे.
बीड शहरात विविध १६ रस्ते नगरोत्थान योजनेतून करण्यात येत आहेत. यासाठी ८५ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी आहे. १६ पैकी ८ रस्ता कामाला सुरूवात झाली आहे. ही सर्व रस्ते जवळपास १८ किलो मिटर अंतराचे आहेत. चालू आठ पैकी खंडेश्वरी मार्ग, खासबाग मार्ग, कालिका नगर व अन्य एक असे चार रस्ता कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु सुरू असलेल्या इतर चार कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडे जाणारा रस्ता एका बाजूनेच बनविला आहे. एक बाजू अद्यापही अपुर्ण आहे. नवीन रस्त्यावरून खाली उतरण्यास जागा नाही. तसेच लोखंडी गजही बाहेर आल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्ता कामांमुळे नागरीक, वाहनधारक वाट मोडत असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार एवढा गंभीर असतानाही पालिकेकडून ही कामे गतीने करण्यास दुर्लक्ष केले जात आहे. वेगवेगळ्या तांत्रीक अडचणी सांगून रस्ता कामांकडे कानाडोळा केला जात असल्याने बीडकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
कामांना १८ महिन्यांचा कालावधी
पािलकेच्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१८ ला या रस्ता कामांस प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. एप्रिल २०१९ च्या सुमारास या कामांना सुरूवात झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु अद्याप ८ कामांना सुरूवातच नाही. तर सुरू असलेल्या ८ पैकी चार कामे अद्यापही अपूर्णच आहेत. त्यामुळे १८ महिन्यांच्या कालावधीत सर्व कामे पूर्ण होतील का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आणि अती घाईत कामे केली तर ती दर्जेदार होतील का? याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे.
मुख्याधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
याबाबत पालिका मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना बाजू समजून घेण्यासाठी भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. मात्र, त्यांनी कॉल न घेतल्याने बाजू समजली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ते औरंगाबादला न्यायालयात असल्याचे समजले. उशिरापर्यंत त्यांचा परत कॉल आला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.