ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:39+5:302021-07-22T04:21:39+5:30

अंबाजोगाई: जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत ...

Roads in rural areas without asphalting | ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

Next

अंबाजोगाई: जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाट लागली आहे. अनेकदा लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही दुर्लक्ष झाले आहे. डोळ्यांसमोर संकट दिसत असूनही दुसरा मार्गच नसल्याने याच मार्गावरून प्रवास करावा लागतो. आरोग्यासह इतर कामांसाठी नियमित तालुक्याला जावेच लागते. मात्र, रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे.

------------------------------

स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण

अंबाजोगाई : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नगर परिषदेने कोरोना संसर्गामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

------------------------

विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत. आता विद्यार्थी घरी राहून कंटाळले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होईल, अशी पालकांना विचारणा करीत आहेत. शासनाने कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तापडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

---------------------------------

भाजीपाल्याचे भाव पुन्हा कडाडले

अंबाजोगाई: किरकोळ भाजीपाल्याचे दर प्रति किलो शंभरीच्या जवळपास गेले आहेत. कांदे, टोमॅटो, बटाटे, वांगे, मिरची वाट्टेल त्या भावाने विकली जात आहे. याचा फटका गरिबांना बसत आहे. त्यामुळे किमती कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

----------------------------

निराधारांना शासकीय योजनांचा लाभ द्या

अंबाजोगाई: श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, अशा योजनांतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते. मात्र, या योजनांचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

------------------------------

त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या वाढली

अंबाजोगाई : श्वानांमध्ये त्वचारोगाचे प्रमाण वाढले असून त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या देखील वाढली आहे. शहरात जवळपास सर्वच भटक्या श्वानांना कमी-अधिक प्रमाणात त्वचारोगाची लागण झाली आहे. त्यामुळे भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रात्री एकट्या व्यक्तीने पायी जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे आहे. शहरात गल्लोगल्ली त्वचारोग झालेले भटके श्वान फिरताना दिसतात. या श्वानांनी जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येईल, अशी परिस्थिती आहे. घाण पाणी प्यायल्याने अथवा उकिरड्यावरील फेकलेले जेवण खाल्ल्याने या श्वानांच्या पोटात जंत होतात आणि त्यामुळे त्यांना त्वचारोग होतो, असे पशुवैद्यकीय डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Web Title: Roads in rural areas without asphalting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.